मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – मुलाच्या हव्यासपोटी पतीनेच गर्भवती पत्नीला चुकीच्या गोळ्या देऊन तिच्या गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी आरोपी पतीला कांदिवली पोलिसांनी अटक केली. जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल होताच आरोपी पती पळून गेला होता, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
३४ वर्षांची तक्रारदार महिला ही दिवा येथे राहत असून घरकाम करते. दहा वर्षांपूर्वी तिचे विजय (नावात बदल) या तरुणासोबत अहमदाबाद येथे लग्न झाले होते. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत सात वर्ष दिवा येथे वास्तव्यास होती. त्यांना आठ वर्षांची एक मुलगी आहे. लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु झाले होते. सतत होणार्या भांडणाला कंटाळून तिचा पती त्याच्या मुलीसोबत गुजरात येथील निघून गेला होता. त्यानंतर तो अधूनमधून तिला भेटण्यासाठी मुलीसोबत दिवा येथे येत होता. मार्च २०२२ रोजी तो तिला भेटण्यासाठी दिवा येथे आला होता. यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्यातून ती गरोदर राहिली होती. ही माहिती तिने तिच्या पतीला सांगितल्यानंतर त्याने तिला यावेळेस मुलगाच हवा असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर तो तिला लिंग चाचणी टेस्टसाठी दबाव आणत होता. या टेस्टला तिचा विरोध होता. जुलै महिन्यांत त्याचे आई-वडिल गावाहून त्यांच्या कांदिवलीतील राहत्या घरी आले होते. यावेळी तो तिला घेऊन कांदिवली येथे आला होता. त्यावेळेस ती पाच महिन्यांची गरोदर होती. त्याने तिला काही गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्या तिच्या प्रकृतीसाठी चांगल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्या गोळ्या खाल्या होत्या. त्याच रात्री ते दोघेही दिवाला घरी जाण्यासाठी निघाले. मात्र गोळ्या खाल्याने तिच्या पोटात दुखू लागले होते.
कांदिवली रेल्वे स्थानकातच तिची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी तपासून आंतरुग्ण म्हणून दाखल करुन घेतले. २३ जुलै २०२२ रोजी तिच्या पोटात जास्त दुखू लागल्याने तिचा गर्भपात झाला होता. उपचारादरम्यान तिला तिच्या पतीने गर्भपात होण्यासाठी चुकीच्या गोळ्या दिल्याचे समजले होते. त्यामुळे तिने तिच्या पतीविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना गुन्हा नोंदवून आरोपी पतीविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी विकेशविरुद्ध ३१३ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र गुन्हा दाखल होताच तिचा पती पळून गेला होता. गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. चौकशीदरम्यान त्याला पहिली मुलगी झाली होती, त्यामुळे त्याला दुसरी मुलगी नको होती. मुलासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र तिची पत्नी गर्भचाचणीसाठी तयार होत नव्हती. त्याला दुसरी मुलगी होणार असल्याची भीती वाटत होती, त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीला चुकीच्या गोळ्या खाण्यासाठी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.