21 वर्षांच्या तरुणीला कोंडून जबदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न

दागिने गहाण ठेवून मारहाण करणार्‍या दोन्ही नातेवाईकांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादानंतर पुण्यात नोकरीच्या आमिष दाखवून फूस लावून आणलेल्या एका 21 वर्षांच्या तरुणीला तिच्या नातेवाईकांनी घरात जबदस्तीने कोंडून ठेवून, तिचे सोन्याचे दागिने गहाण करुन तिला बेदम मारहाण केल्याचा तसेच तिचे औरंगाबाद येथे एका तरुणाशी जबदस्तीने लग्न लावून तरुणाकडून अडीच लाख रुपये वसुल करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. मेनका अरविंद सिंग आणि रणजीत राधेश्याम सिंग अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

21 वर्षांची तक्रारदार तरुणी ही कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात राहते. तिच्या वडिलांनी स्वतची सिक्युरिटी कंपनी असून ते सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम करतात. बारावीस नापास झाल्यानंतर ती सध्या घरी राहत होती, तिचे बहिण-भाऊ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. तिच्या वडिलांच्या लहान भावाची मेनका सिंग ही सासू असून ती पुण्यातील वडू परिसरात राहते. तिची बहिण रंजू सिंग असून तिचा रणजीत हा मुलगा आहे. नोव्हेबर 2024 रोजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिचे एका तरुणाशी ठरले होते. त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र तो तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठा असल्याने तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. घरी राहत असल्याने तिच्याकडे काहीच काम नव्हते. त्यामुळे ती सकाळी उशिरा उठल्यावरुन तसेच जास्त वेळ मोबाईल वापरत असल्याने तिच्या वडिलांनी तिला मारहाण केली होती.

2 जुलैला झालेल्या या मारहाणीनंतर ती रागाच्या भरात घर सोडून तिच्या चुलत सासू मेनका सिंग हिच्या पुण्यातील राहत्या घरी आली होती. यावेळी तिने घरातून काही दागिने आणि पन्नास हजार रुपये घेतले होते. ते दागिने आणि कॅश तिने मेनकाकडे दिले होते. मेनकाला तिला पुण्यात नोकरीचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान तिला मेनकाकडून तिच्या वडिलांनी तिची मिसिंग तक्रार केल्याचे समजले होते. काही दिवसांनी तिला मेनकाने तिची सोन्याची अंगठी गहाण ठेवून पंधरा हजार रुपये घेतल्याचे सांगितले. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर मेनकाला तिला मारहाण केली होती. 30 ऑगस्टला तिला मेनका आणि रणजीतने पुण्यातून औरंगाबाद येथील करमाड येथे आणले होते. तिथे गेल्यानंतर ते वेगवेगळ्या रुम आणि हॉटेलमध्ये राहत होते. यावेळी या दोघांनी तिला घरात कोंडून ठेवले होते. तिला घराबाहेर कुठेही जाण्यास मनाई केली होती.

याच दरम्यान तिथे दोन तरुण आले होते. यावेळी मेनकाने तिची ओळख तिच्या बहिणीची मुलगी असल्याचे करुन दिली होती. ते दोन्ही तरुण तिला पाहण्यासाठी आले असून त्यापैकी एका तरुणासोबत तिचे लग्न करणार असल्याचे सांगितले. काही वेळानंतर ते दोघेही तेथून निघून गेले. त्यानंतर मेनका आणि रणजीतने एका तरुणाला कॉल करुन त्याच्याकडे लग्नासाठी चार लाखांची मागणी केली होती. यावेळी तो तरुण त्यांना चारऐवजी अडीच लाख रुपये देण्यास तयार झाला होता. त्यांच्यातील ते संभाषण ते लाऊडस्पिकरवर बोलत असल्याने तिला हा प्रकार समजला होता. हा प्रकार तिने रणजीतच्या एका मित्राला सांगितल्यानंतर रणजीत आणि त्या मित्रांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिला घरातून पळून जाण्यास मदत केली होती.

घरातून पळून गेल्यानंतर ते दोघेही औरंगाबाद येथून परभणी आले होते. तिथे एका लॉजवर थांबल्यानतर तिने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे वडिल परभणीला गेले आणि तिला पुन्हा मुंबईत घेऊन आले. पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून या दोघांनी तिच्याकडील दागिने कॅश घेतले, तिला औरांबाद येथे कोंडून ठेवून तिचे जबदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न करुन मुलाकडून अडीच लाख रुपये घेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मेनका सिंग आणि रणजीत सिंग यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्यास सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोन्ही आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशांनतर कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने पुण्यातून मेनका सिंग आणि रणजीत सिंग या दोघांना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणणयात आले होते. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page