विनयभंगाची तक्रार केली म्हणून विवाहीत महिलेवर ब्लेडने हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – विनयभंगाची तक्रार केली म्हणून एका 33 वर्षांच्या विवाहीत महिलेवर तिच्याच परिचित आरोपीने ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून कांदिवली पोलिसांनी पळून गेलेल्या अमीत हिंमतभाई देसाई या 40 वर्षांच्या आरोपीस अटक केली. तक्रारदार महिला आणि आरोपी एकाच इमारतीचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी 7 ऑक्टोंबरला रात्री आठ वाजता कांदिवलीतील साईनगर, भारत बँकेजवळील न्यू पाकिजा एसआरए सोसायटीजवळ घडली. याच परिसरात 33 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पतीसोबत राहते. खार येथील एका खाजगी कंपनीत ती कामाला आहे. तिच्याच इमारतीमध्ये अमीत देसाई हा राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहे. अमीत हा तिचा नेहमीच मानसिक शोषण करत होता. अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.
मंगळवारी 7 ऑक्टोंबरला रात्री आठ वाजता ती कामावरुन तिच्या घरी निघाली होती. कांदिवली रेल्वे स्थानकातून ती रिक्षातून प्रवास करुन तिच्या घराजवळ आली होती. यावेळी तिच्या मागून अमीत आला. काही कळण्यापूर्वीच त्याने तिचे तोंड दाबून तिला जमिनीवर खाली पाडले होते. तिला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी तिने आरडाओरड करुन लोकांना मदतीसाठी आवाज देण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान अमीतने त्याच्याकडील स्टेनलेस स्टिलच्या धारदार बेल्डने तिच्या मानेवर, चेहर्यावर, दोन्ही हातांवर वार केले होते. त्यात ती गंभीर जखमी झाली होती.
ब्लेड हल्ल्यामुळे तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागले होते. तिला प्रचंड वेदना होत असल्याने तिने पुन्हा जोरात आरडाओरड सुरु केली होती. याच दरम्यान अमीत देसाई तेथून पळून गेला. घडलेला प्रकार तिने तिच्या पतीला सांगून घटनास्थळी बोलावून घेतले. ही माहिती ऐकल्यानंतर त्याला धक्काच बसला होता. त्यामुळे तो घटनास्थळी आला होता. तिथे गेल्यानंतर त्याला त्याची पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आली. त्यामुळे तिने तिला स्थानिक रहिवाशांच्या मदतीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अमीत देसाईविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सोमवारी त्याला कांदिवली येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या महिलेने अमीतविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. त्याचा अमीतच्या मनात राग होता. याच रागातून त्याने या महिलेवर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.