श्रीरामांचा फोटोसह भगवा झेंडा लावला म्हणून डिलीव्हरी बॉयला मारहाण
धार्मिक द्वेषसह भावना भडकाविल्याप्रकरणी आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 नोव्हेंबर 2025
मुंबई, – बाईकच्या मागील बाजूस स्टिल रॉडवर श्रीरामांचा फोटोसह भगवा झेंडा लावला म्हणून एका 33 वर्षांच्या डिलीव्हरी बॉयला शिवीगाळ करुन बेदम मारहाण झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. या मारहाणीत दिपक राजकुमार शर्मा याला किरकोळ दुखापत झाली होती. याप्रकरणी दोन समाजामध्ये धार्मिक द्वेष पसरवून धार्मिक भावना भडकावून शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी अमीर अस्लम शेख या 32 वर्षांच्या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता कांदिवलीतील पोयसर, रघुलिला मॉलसमोर घडली. दिपक शर्मा हा बोरिवलीतील सुकरवाडी, लक्ष्मी-रामा चाळीत राहत असून डॉमिनोजमध्ये डिलीव्हरी बॉयचे काम करतो. या कामासाठी त्याने एक बाईक घेतली होती. या बाईकच्या मागे त्याने स्टिल रॉडमध्ये श्रीरामांचा फोटो आणि जय श्रीराम लिहलेला भगव्या रंगाचा झेंडा लावला होता. शुक्रवारी 7 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर हजर झाला होता. यावेळी त्याला कांदिवलीतील जयभीमनगर, एकता इमारतीचे एक पार्सल ऑर्डर मिळाले होते.
रात्री पावणेबारा वाजता तो ऑर्डर घेऊन त्याच्या बाईकवरुन कांदिवलीतील रघुलिला मॉलसमोर आला होता. एका ग्राहकासोबत मोबाईलवरुन बोलत असताना तिथे एक तरुण आला आहे. त्याने त्याला काय ऑर्डर घेऊन आला आहेस का अशी विचारणा केली होती. त्याने होकार दिल्यानंतर त्याने बाईकच्या मागे लावलेल्या श्रीरामांचा फोटो आणि भगव्या झेंड्याबाबत विचारणा करुन तू हिंदू आहेस का मुसलमान आहे. झेंडा काढण्यावरुन त्याला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. काही वेळानंतर त्याने त्याला हाताने बेदम मारहाण केली होती. यावेळी तिथे काही लोक जमा झाले होते.
त्यापैकी एकाने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी दिपक शर्मासह मारहाण करणार्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान दिपकच्या बाईकवर असलेल्या श्रीरामांचा फोटो आणि भगव्या झेंड्यावरुन त्याला संबंधित व्यक्तीने जाब विचारुन, अश्लील शिवीगाळ करुन बेदम मारहण केल्याचे उघडकीस आले.
चौकशीत त्याचे नाव अमीर शेख असल्याचे उघडकीस आले. 32 वर्षांचा अमीरचा स्वतचा व्यवसाय असून तो कांदिवलीतील पोयसर, रघुलिला मॉलसमोरील बोरसपाडा, जयभीमनगरात राहतो. याप्रकरणी दिपक शर्माच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध श्रीरामांचा फोटो आणि भगवा झेंडा लावल्यावरुन शिवीगाळ करुन मारहाण करणे, धार्मिक द्वेष निर्माण करुन धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.