वयोवृद्ध महिलेच्या घरी चोरी करुन पळालेल्या नोकराला अटक

घरसफाई करताना हातसफाई करुन पाच लाखांचे दागिने पळविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – कांदिवलीतील एका वयोवृद्ध महिलेच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या नोकराला काही तासांत कांदिवली पोलिसांनी अटक केली. राकेश जयानंद महतो असे या नोकरीचे नाव असून चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.

68 वर्षांची तक्रारदार वयोवृद्ध महिला इलाबेन मनूभाई मेहता ही तिच्या मुलासोबत कांदिवलीतील महावीरनगर, आयकोन हाईट इमारतीमध्ये राहते. पाच वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. तिचा मुलगा रियल इस्टेटचे काम करतो. गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्याकडे राकेश हा घरगडी म्हणून काम करत होता. सकाळी काम करुन तो अर्ध्या किंवा एक तासानंतर निघून जात होता. बुधवारी तिच्या मुलाने ड्राव्हरमधील सोन्याची पाहणी केली असता त्यात दागिने होते, त्यानंतर तो कामावर निघून गेला. काही वेळानंतर राकेश हा त्यांच्या घरी कामासाठी आला होता. मात्र काम न करता तो काही वेळात घरातून तिला काहीच न सांगता निघून गेला.

हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने ड्राव्हरमधील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी तिला ड्राव्हरमधील सुमारे पाच लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. कामासाठी घरी आलेल्या राकेशनेच ड्राव्हरमधील दागिने चोरी करुन पलायन केले होते. तिने राकेशला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने मोबाईल बंद केला होता. त्यामुळे तिने कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन पाहणी करुन तिच्या तक्रारीवरुन राकेश महतो याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गुरुवारी पळून गेलेल्या राकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page