मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बँकेकडून देण्यात आलेल्या नवीन डेबीट कार्डचा एटीएम पीन सेट करताना कार्डची अदलाबदल करुन पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. सय्यब कलामुद्दीन खान असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
45 वर्षांचे तक्रारदार कांदिवली येथे राहत असून ते पीओपीचे काम करतात तर त्यांची पत्नी शिक्षिका आहे. त्यांचे एका बँकेत संयुक्त बँक खाते आहे. त्यांच्या डेबीट कार्डची व्हॅलिडिटी संपल्याने त्यांना पंधरा दिवसांपूर्वी बँकेने दुसरे नवीन डेबीट कार्ड दिले होते. 13 जानेवारी ते त्यांच्या पत्नीसोबत नवीन डेबीट कार्ड घेऊन बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आले होते. तिथे ते दोघेही नवीन एटीएमचा पीन सेट करत होते. याच दरम्यान तिथे एक व्यक्ती आला. त्याने त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या डेबीट कार्डची अदलाबदल केली होती. त्यानंतर त्याने दुसर्या एटीएम सेंटरमधून त्यांच्या डेबीट कार्डवरुन पन्नास हजार रुपये काढले होते.
खात्यातून 50 हजार रुपयांचा मॅसेज प्राप्त होताच ते बँकेत गेले आणि त्यांनी बँक कर्मचार्यांकडे विचारणा केली होती. त्यांनी त्यांच्या कार्डची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडील बँकेचे डेबीट कार्ड बोगस असल्याचे उघडकीस आले होते. या व्यक्तीनेच बोलण्यात गुंतवून डेबीट कार्डची अदलाबदल करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एटीएमसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सय्यब खान याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.