मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कांदिवलीतील शॉपमधून सुमारे 20 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करुन कारागिरानेच पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अस्लम या मुख्य आरोपीचा कांदिवली पोलिसांकडून शोध सुरु आहे तर त्याच्या दोन सहकार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. साहिल हिदयरहमान शेख आणि अजीफर मुजीद शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून चोरीचे काही दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अस्लम हा कोलकाता येथे पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम तिथे पाठविण्यात आली आहे.
साफिकुल इस्लाम हबीबर रेहमान मंडल हे कांदिवली येथै राहत असून त्यांचा गोल्ड पॉलिश व डिझाईनचा व्यवसाय आहे. कांदिवलीतील एम. जी रोड, काळा हनुमान मंदिर, रामजी पिल्लू कंपाऊंड परिसरात त्यांचा स्वतचा एक शॉप आहे. तिथे चार कारागिर कामाला असून सकाळी साडेदहा ते रात्री साडेदहा या कालावधीत शॉपचे कामकाज चालते. 9 फेब्रुवारीला ते सकाळी साडेदहा वाजता शॉपमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी सर्व कारागिरांना काम दिले होते. दुपारी मुलाला शाळेत सोडून आल्यानंतर त्यांना नवीन आलेला कारागिर अस्लम तिथे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.
काही वेळ त्याची वाट पाहून तो परत शॉपमध्ये आला नाही. चौकशीदरम्यान त्यांना शॉपमधील 104 गॅम वजनाचे नऊ ब्रेसलेट आणि 33 ग्रॅम वजनाची अंगठी असा 20 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी शॉपमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात अस्लम हा शॉपमधून जाताना दिसून आला. तो शॉपमधील सोन्याचे दागिने चोरी करुन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी कारागिराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.
तपासात अस्लमला त्याच्या इतर काही सहकार्यांनी मदत केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण सोनकवडे यांच्या पथकाने साहिल शेख आणि अजीफर शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनी अस्लमच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेनंतर अस्लम हा पळून गेला आहे.
तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी असल्याने चोरीनंतर त्याच्या गावी पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम कोलकाता येथे रवाना झाली आहे. दरम्यान अटकेनंतर साहिल आणि अजीफर या दोघांनाही शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.