हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
कांदिवली पोलिसांची कारवाई; तीन महिन्यांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जून २०२४
मुंबई, – पूर्ववैमस्नातून संदीप शिवप्रसाद गौड या २२ वर्षांच्या तरुणाला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन नंतर तिक्ष्ण हत्याराने वार करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. सुमीत सूर्यकांत पासी ऊर्फ सुमीत सरोज असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर सुमीत हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला कांदिवली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
संदीप हा कांदिवलीतील इराणीवाडी, रामजीत यादव चाळीत त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. याच परिसरात गुरुप्रसाद यादव ऊर्फ चिंटू आणि सुमीत सरोज हे राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. मार्च महिन्यांत त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून ७ मार्च २०२४ रोजी कांदिवलीतील अखिलाखनगर, मनिष मेडीकलजवळ चिंटू आणि सुमीतने त्याला अडविले. त्याच्याशी वाद घालून त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सुमीतने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. जखमी झालेल्या संदीपला नंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुरुप्रसाद यादव आणि सुमीत सरोज यांच्याविरुद्ध ३२३, ३०७, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सुमीत हा पळून गेला होता, त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सुमीतला कांदिवली येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.