मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचे पेमेंट न करता एका व्यावसायिकाची एक कोटी सतरा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या आरोपी व्यावसायिकाला अकरा महिन्यानंतर अटक करण्यात कांदिवली पोलिसांना यश आले आहे. विक्रम ओमप्रकाश श्रीवास्तव ऊर्फ विकी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांचा त्याचा पार्टनर व्यावसायिक दर्शन भरतकुमार चुडघर हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जीतनारायण हरिबहादूर प्रधान हे कांदिवली परिसरात राहत असून त्यांची क्रिस्टल टेक्नोलॉजी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी आयटी हार्डवेअर-सॉफ्टवेअर पार्ट पुरवठादार म्हणून काम करते. गेल्या आठ वर्षांपासून ते डेल, एचपी, लिनोव्हो, एसर, एसुस आणि इतर कंपन्यांचे लॅपटॉप, संगणकासह इतर साहित्य विविध कंपन्याच्या माध्यमातून विक्री करत होते. एप्रिल २०२३ रोजी त्यांची पद्मावती इंटरप्रायजेस मालक विक्रम श्रीवास्तवशी ओळख झाली होती. याच कंपनीत दर्शन चुडघर हा पार्टनर म्हणून काम करत होता. त्यांनी त्यांच्या कंपनीसोबत व्यवसाय सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता, मात्र नंतर त्यांनी त्यांच्या कंपनीसोबत व्यवहार सुरु केला होता. त्यानंतर जीतनारायण प्रधान यांनी पद्मावती इंटरप्रायजेस कंपनीला १ कोटी ५४ लाख ३८ हजाराचे विविध कंपनीचे लॅपटॉप, संगणक, हिकव्हिजन सीसीटिव्ही कॅमेरा, डीव्हीआर, एनव्हीआर, स्टोरेज, हार्ड ड्राईव्ह आदी साहित्य पाठवून दिले होते. त्यापैकी ३६ लाख ७७ हजार रुपयांचे पेमेंट कंपनीने केले,
मात्र उर्वरित रक्कमेचे एक कोटी सतरा लाख रुपयांचे धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याबाबत कंपनीने विक्रम श्रीवास्तव आणि दर्शन चुडघर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी गोरेगाव येथील कंपनीत जाऊन पाहणी केली असता तिथे दुसर्या कंपनीचे कार्यालय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती या दोघांनी अशाच प्रकारे पुण्यातील एका कंपनीकडून दिड ते दोन कोटीचे साहित्य घेऊन त्यांचे पेमेंट न करता कंपनीची फसवणुक केली होती. त्यानंतर त्यांनी जीतनारायण यांच्या कंपनीकडून कोट्यवधी रुपये साहित्य घेऊन १ कोटी १७ लाख रुपयांचे पेमेंट न करता कंपनीची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विक्रम श्रीवास्तव अणि दर्शन चुडघर या दोन्ही व्यावसायिकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने तांत्रिक माहितीवरुन अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या विक्रम श्रीवास्तव ऊर्फ विकी याला अटक केली. त्याने त्याच्या पार्टनर व्यावसायिकाच्या मदतीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असून त्याच्या अटकेने फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.