हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील आरोपीस उत्तरप्रदेशातून अटक
चोरीच्या संशयावरुन बिगारी कामगारावर हातोड्याने हल्ला केला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मिस्त्री कामाची बॅग चोरी केल्याच्या संशयावरुन सोनू हरिश्चंद्र तिवारी या ३२ वर्षांच्या बिगारी कामगारावर हल्ला केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. मनोज शिवनाथ सरोज असे या ४५ वर्षांच्या आरोपीचे नाव असून हल्ल्यानंतर तो उत्तरप्रदेशात पळून गेला. अखेर त्याला पाच दिवसांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवार २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना १९ ऑगस्ट सोमवारी रात्री साडेबारा वाजता कांदिवलीतील एस. व्ही रोड, पूर्विका शॉपीजवळील देना बँक सिग्नल फुटपाथवर घडली. सोनू हा बिगारी कामगार असून कांदिवली परिसरात राहतो. त्याचे घरात भांडण झाल्याने तो घर सोडून देना बँक सिग्नलजवळील फुटपाथवर राहत होता. तिथेच मनोज हादेखील राहतो. मनोज हा मिस्त्रीकाम करतो. त्याची मिस्त्री कामाची बॅग चोरीस गेली होती. ही बॅग सोनूने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्याने त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी रागाच्या भरात त्याने सोनूवर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या सोनूला तिथेच टाकून तो पळून गेला होता. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सोनूला नंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोनूच्या जबानीवरुन पोलिसांनी मनोजविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तपासात आरोपीचे नाव मनोज असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती काढून त्याची जास्तीत जास्त माहिती काढण्यात येत होती. त्यात पोलिसांना यश आले.
चौकशीदरम्यान मनोज हा हल्ल्यानंतर त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते, पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, श्रीकांत मगर, नितीन साटम, मपोज गदळे, सहाय्यक फौजदार गोटमुखले, पोलीस हवालदार सत्यवान जगदाळे, श्रीकांत तावडे, वामन जायभाये, राजेश गावकर, शरद गावकर, शिवाजी नारनवर, पोलीस शिपाई सुजन केसरकर, योगेश हिरेमठ, स्वप्निल जोगलपुरे, चिंरजीवी नवलू, प्रविण वैराळ, परमेश्वर चव्हाण, जनार्दन गवळी, प्रशांत कुंभार, दादासाहेब घोडके आदींचे एक पथक उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मनोज सरोजला त्याच्या उत्तरप्रदेशातील गावातून शिताफीने ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सोनू तिवारीवर हातोड्याने हल्ला केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत आणल्यानंतर त्याला अटक करुन बोरिवलीतील कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.