मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मोबाईल हॅक करुन एका वडापाव विक्रेत्याच्या बँक खात्यातून साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
४० वर्षांचे तक्रारदार कांदिवली परिसरात राहत असून याच परिसरात त्यांचा वडापाव विक्रीचा स्टॉल आहे. १५ सप्टेंबरला ते त्यांच्या स्टॉलवर काम करत होते. यावेळी त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ते मॅसेज पाहिले असता त्यांच्या बँक खात्यातून चार ऑनलाईन व्यवहार होऊन सुमारे साडेतीन लाख रुपये डेबीट झाले होते. त्यांनी कोणाशी व्यवहार किंवा पैसे पाठविले नव्हते. तरीही त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार पैसे डेबीट झाले होते. त्यामुळे त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केली होती. यावेळी त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे ते बँकेत गेले होते. त्यांनी त्यांच्या व्यवहाराचा तपशील पाहिले असता त्यांच्या बँक खात्यातून इतर चार बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित स्टेटमेंट घेऊन कांदिवली पोलीस ठाण्यात आले होते. तिथे त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात तक्रारदाराचा मोबाईल डिव्हाईल इंटरनेटरच्या माध्यमातून हॅक करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा कांदिवली पोलीस ठाण्यातील सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. संबंधित बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.