मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जून २०२४
मुंबई, – नशा करणार्या तरुणावर कारवाई म्हणून कर्तव्य बजाविणार्या पोलीस हवालदाराशी वाद घालून हुज्जत घालणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. भव्य विरल शहा आणि कौशिल विपुल शहा अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
भरत हरिश्चंद्र नाईक हे वसईतील बंदरपाडा, अर्नाळा येथे राहत असून कांदिवली पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी १५ जूनला ते बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते. रात्री दहा वाजता ते कांदिवलीतील महावीरनगर, अलबेला चायनीसजवळ जात होते. यावेळी तिथे साहिल नावाचा एक तरुण गांजा पिताना दिसून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलीस पथक पोलीस ठण्याच्या दिशेने जात होते. यावेळी तिथे प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला गर्दी करु नका असे सांगितले. याच गर्दीतून एका तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. नशा करणार्या तरुणाला सोडून देण्याची मागणी करुन तो पोलिसांना शिवीगाळ करत होता. यावेळी त्याला शांत राहून शिवीगाळ तसेच हुज्जत घालू नकोस असे सांगून तो पोलिसांचा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याच दरम्यान या तरुणासह दोघांनी भरत नाईक यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यामुळे या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे आणल्यानंतर त्यांची नावे भव्य शहा आणि कौशिल शहा असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही कांदिवलीतील महावीरनगर रहिवाशी आहे. याप्रकरणी भरत नाईक यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध पोलिसांना शिवीगाळ करुन हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.