घरासमोर खेळणार्या चार वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच 50 वर्षांच्या सुरक्षारक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – मित्र-मैत्रिणीसोबत घरासमोरच खेळणार्या एका चार वर्षांच्या मुलीशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी 50 वर्षांच्या आरोपी सुरक्षारक्षकाला समतानगर पोलिसांनी अटक केली. राजेशकुमार असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
27 वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून पिडीत तिची चार वर्षांची मुलगी आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता ती तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत घराजवळ खेळत होती. यावेळी तिथेच सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा राजेशकुमार आला. त्याने तिला स्वतजवळ बोलावून तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिने त्याला विरोध केल्यानंतर त्याने तिच्या गुप्त भागांवर लैगिंक अत्याचार केला होता.
या प्रकारामुळे ती घाबरली आणि तिने घरी गेल्यानंतर तिच्या आईला सिक्युरिटी गार्ड अंकल गंदे आहे असे सांगून घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने समतानगर पोलिसांना ही माहिती सांगून आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी राजेशकुमार याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. 50 वर्षाचा राजेशकुमार हा कांदिवलीतील कुरार व्हिलेज परिसरात राहत असून तो कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता असे पोलिसांनी सांगितले.