मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मे 2025
मुंबई, – आठ आणि दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच नराधम पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी 35 वर्षांच्या पित्याविरुद्ध समतानगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
30 वर्षांची तक्रारदार महिला ही आरोपी पतीसह आठ आणि दहा वर्षांच्या दोन मुलीसोबत कांदिवली परिसरात राहते. ती घरकाम करुन स्वतच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवते. अनेकदा कामावर गेल्यानंतर तिच्या दोन्ही मुली एकट्याच घरी राहत होत्या. हीच संधी साधून मुलीच्या पित्याने दोन्ही मुलींशी जवळीक निर्माण करुन त्यांच्याशी अश्लील चाळे सुरु केले होते. नंतर तो दोन्ही मुलींशी अश्लील चाळे करुन त्यांच्याशी लैगिंक अत्याचार करत होता. नोव्हेंबर 2024 ते मे 2025 या कालावधीत हा प्रकार सुरु होता. प्रत्येक वेळेस तो दोघींना हा प्रकार कोणालाही सांगू नका, नाहीतर जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे जिवाच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. दोन दिवसांपूर्वी पिडीत मुलींनी घडलेला प्रकार त्यांच्या तक्रारदार आईला सांगितला होता.
हा प्रकार ऐकल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार समतानगर पोलिसांना सांगून आरोपी पतीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीची समतानगर पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मंगळवारी उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
चेंबूर येथे अल्पवयीन मुलावर अत्याचार
ही घटना ताजी असताना चेंबूर येथे एका नऊ वर्षांच्या मुलावर त्याच्याच परिचित सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सोळा वर्षांच्या मुलाला आरसीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. 30 वर्षांचे तक्रारदार रिक्षाचालक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहतात. बळीत हा त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा असून आरोपी मुलगा त्यांच्याच शेजारी राहतो. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांचा मुलगा घरासमोरच खेळत होता. यावेळी तिथे आरोपी मुलगा आला आणि बळीत मुलाला त्याच्या घरी आणले. तिथेच त्याच्यावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. तसेच घरी न जाण्याची धमकी दिली होती. मात्र त्याने त्याच्या तावडीतून स्वतची सुटका करुन घडलेला प्रकार त्याच्या पित्याला सांगितला. त्यानंतर त्याच्या पित्याने आरसीएफ पोलिसांत आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.