रॉबरीच्या उद्देशाने ६४ वर्षांच्या वयोवृद्धावर हल्ला करणार्‍या त्रिकुटास अटक

गुन्हा दाखल होताच चार तासांत चोरीच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – रॉबरीच्या उद्देशाने एका ६४ वर्षांच्या वयोवृद्धावर तीनजणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला करुन सोन्याचे दागिने, मोबाईलसह असा एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. याप्रकरणी रॉबरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. संतोष रामचंद्र घाटकर, अनिल रामचंद्र घाटकर, ओमप्रकाश पलगधारी भारती अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी १२ मार्चला दुपारी साडेतीन वाजता कांदिवलीतील महावीरनगर, पवार पब्लिक स्कूलजवळील शांतीनिकेतन सोसायटीमध्ये घडली होती. याच सोसायटीमधील प्लॉट क्रमांक ३०१ मध्ये अँटनी अल्ल्यूया रोचां हे ६४ वर्षांचे तक्रारदार वयोवृद्ध राहतात. मंगळवारी दुपारी ते त्यांच्या घरी आराम करत होते. यावेळी त्यांच्या घरी तीन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. काही कळण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्या तोंडाला कपडा बांधून हाताने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, कडे आणि मोबाईल असा एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोलिसांत तक्रार केली तर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पलायन केले होते. या प्रकाराने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली होती. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

अँटनी रोचां यांची जबानी नोंदवून कांदिवली पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध ३९४, ४५२, ५०४, ५०६ (२), ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. दिवसाढवळ्या घरात घुसून एका वयोवृद्धावर हल्ला करुन झालेल्या लुटमारीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, सखाराम काळे, पोलीस हवालदार जायभाये, बाळासाहेब काळे, पोलीस शिपाई नवलू, प्रविण वैराळ, गवळी, मोरे, राणे यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या संतोष घाटकर, अनिल घाटकर आणि ओमप्रकाश भारती या तिघांनाही कांदिवली परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला. यातील संतोष आणि अनिल हे दोघेही सख्खे भाऊ असून ते कांदिवलीतील आकुर्ली रोड, बोरसपाडा तर ओमप्रकाश हा ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहतो. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना बुधवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांनी वर्तविली आहे.

वयोवृद्धावर हल्ला करुन लुटमार करणार्‍या तिन्ही आरोपींना अवघ्या चार तासात अटक करणार्‍या सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, सखाराम काळे, पोलीस हवालदार जायभाये, बाळासाहेब काळे, पोलीस शिपाई नवलू, प्रविण वैराळ, गवळी, मोरे, राणे यांचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page