तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग
कांदिवलीतील शाळेतील घटना; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शिक्षकाने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाळेच्या वतीने मुख्याधापिकेने कांदिवली पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जानंतर आरोपी शिक्षकाविरुद्ध कांदिवली पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच आरोपी शिक्षकाची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी सांगितले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षक, पालकासह विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
तेरा वर्षांची मुलगी ही कांदिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरातील एका शाळेत ती शिकते. २९ जुलेै आणि ३० जुलैला शाळेत असताना तिच्याशी शाळेतील शिक्षकाने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. ही मुलगी काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात दिसत होती. त्यामुळे तिची शाळेच्या मुख्याधापिकेने आपुलकीने विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेत मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले होते. तिथे आलेल्या पालकांना घडलेला प्रकार सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र तिच्या पालकांनी शाळेत हा प्रकार घडला होता. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेवर असल्याने शाळेच्या वतीने तक्रार करुन संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शाळेच्या मुख्याधापिकेने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप शिक्षकाला अटक झाली नसून लवकरच त्याची चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.