कांदिवलीत 25 वर्षांच्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कांदिवली येथे राहणार्या साधना इंद्रपाल चौधरी या 25 वर्षांच्या तरुणीने शनिवारी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर जुबेर खान (23) याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जुबेरकडून साधनाचा मानसिक शोषण सुरु होता, तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप साधनाच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे.
ही घटना शनिवारी सकाळी दहा ते सव्वादहा वाजता कांदिवलीतील गणेशनगर, म्हाडा मैदानाजवळील वाडीलाल गोसालिया रोड, नवयुवक सेवा सोसायटीमध्ये घडली. याच ठिकाणी चंद्रा इंद्रपाल चौधरी ही 48 वर्षांची महिला राहत असून साधना ही तिची मुलगी आहे. तिचे पती दुसरीकडे राहत असून गेल्या सतरा वर्षांपासून त्यांचा तिच्याशी काहीही संबंध नाही. घरात कोणीही कमावता नसल्याने चंद्रा ही घरकाम करत होती. साधनाचे नववीपर्यंत शिक्षण झाले असून ती सध्या कांदिवलीतील महावीरनगर येथील सलूनमध्ये हेल्पर म्हणून कामाला होती. सकाळी दहा वाजता कामावर गेल्यानंतर ती रात्री नऊ वाजता घरी येत होती.
तिचे जुबेर खान या तरुणासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. जुबेर हा नेहमी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी येत होता. हा प्रकार तिला नंतर समजला होता. चौकशीदरम्यान तिने तिचे जुबेरसोबत प्रेम असल्याचे सांगून ते दोघेही लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने त्याच्याशी लग्न करुन तिला घरातून निघून जाण्यास सांगितले होते, मात्र साधनाने तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता चंद्रा ही कामावर घरी आली होती, यावेळी तिला साधना घरात झोपल्याचे दिसून आले. तिने तिला जेवणासाठी बोलाविले, मात्र तिने जेवणास नकार दिला. तिचा मोबाईल तुटला होता, याबाबत विचारणा केल्यानंतर तिने मोबाईल पडल्याचे सांगितले. त्या दिवशी ती प्रचंड मानसिक तणावात होती. मात्र तिने तिला काहीही सागितले नाही.
दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी 22 नोव्हेंबरला चंद्रा ही नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली. यावेळी साधना ही एकटीच घरी होती. सकाळी दहा वाजता तिला ओमप्रकाश चौहाण या शेजारी राहणार्या व्यक्तीने कॉल करुन साधनाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यामुळे ती घरी आली होती. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी साधनाला तातडीने जवळच रिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. यावेळी हॉस्पिटलमध्ये जुबेर खान हादेखील उपस्थित होता. साधनाविषयी माहिती मिळताच तो तिच्यासोबत रिद्धी आणि नंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये आला होता.
चंद्रा कामावर गेल्यानंतर तिच्या घरी जुबेर आला होता. याच दरम्यान त्याचे साधनासोबत भांडण झाले होते. या भांडणानंतर जुबेर तिच्या घरातून निघून गेला होता. ओमप्रकाशच्या चौकशीत जुबेर यानेच साधनाच्या गळ्यातील फास सोडवून तिला हॉस्पिटलमध्ये नेले होते. इतकेच नव्हे तर त्याने तिच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. प्राथमिक तपासात जुबेर हा साधनाचा मानसिक शोषण करत होता. तिला शिवीगाळ करुन सतत मारहाण करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करुन जुबेरविरुद्ध कांदिवली पोलिसात तक्रार केली होती.
या तक्रारीनतर जुबेरविरुद्ध पोलिसांनी साधनाचा मानसिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. जुबेर हा कांदिवलीतील गणेशनगर, एकतानगर मैदानाजवळील सहार इमारतीच्या सी विंग, तिसरा मजल्यावर राहतो. त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.