कांदिवलीत एमबीबीएसच्या २२ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

परिक्षेत कमी मिळाल्याने नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – कांदिवली येथे राहणार्‍या अजय हडवंत जांगिड या २२ वर्षांच्या एमबीबीएसच्या तरुणाने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. परिक्षेत कमी मिळाल्याने मानसिक नैराश्यातून अजयने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी अजयच्या कुटुुंबियांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरले नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. या जबानीनंतर चारकोप पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

ही घटना शुक्रवारी १२ एप्रिलला सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास कांदिवलीतील चारकोप, सेक्टर क्रमांक तीन, पीएफ कार्यालयाजवळील ऍस्टर पॅलेस या इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या ए विंगच्या फ्लॅट क्रमांक ३०२ मध्ये अजय हा राहत होता. तो सध्या लातुरच्या विलासराव देशमुख मेडीकल कॉलेजमध्ये दुसर्‍या वर्षाला शिकत होता. प्रथम वर्गाच्या परिक्षेत त्याला कमी गुण मिळाले होते. तेव्हापासून तो मानसिक तणावात होता. त्यामुळे तो त्याच्या घरी आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. कमी गुण मिळाल्याने प्रचंड नैराश्य आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र या उपचारातून त्याला काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातून शुक्रवारी दुपारी त्याने घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शताब्दी रुग्णालयातून कॉल प्राप्त होताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अजयच्या कुटुंबियांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यात हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जबानी नोंदवून पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.
इमारतीवरुन उडी घेऊन २३ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या
अजय जांगिड याच्या आत्महत्येची घटना ताजी असताना काही वेळात प्रविण आदिमान अचलखाम या २३ वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या निवासी इमारतीच्या सतराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. प्रविणच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांची लवकरच चारकोप पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कांदिवलीतील भाबरेकरनगर, परिश्रम इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या सतराव्या मजल्यावर प्रविण हा त्याच्या आई-वडिल आणि मोठी बहिणीसोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता इमारतीच्या सतराव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे प्रविणने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. या दोघांचे मृतदेह नंतर सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. शुक्रवारी काही मिनिटांच्या अंतराने दोन तरुणांनी केलेल्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page