घरातून निघून गेलेल्या २६ वर्षाच्या तरुणाची आत्महत्या
कांदिवलीतील खदानाजवळ आजाराला कंटाळून जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मंगळवारी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या एका २६ वर्षाच्या तरुणाने कांदिवलीतील खदानाजवळ आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. राहुल महादेव तांबारे असे या तरुणाचे नाव असून आजाराला कंटाळून त्याने जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांची जबानी नोंदविण्यात आली असून त्याच्या आत्महत्येबाबत कोणीही तक्रार केली किंवा संशय व्ये केला नाही. त्यामुळे समतानगर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
कांताबाई महादेव तांबारे ही महिला कांदिवलीतील भीमनगरच्या दामूनगरात राहते. राहुल हा तिचा मुलगा असून त्याला पाठ आणि कमरेचा गेल्या पाच ते सहा वषारपासून प्रचंड त्रास होता. त्यावर त्याचे औषधोपचार सुरु होते. मात्र या उपचारातून त्याला काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याला मानसिक नैराश्य आले होते. त्यातून त्याला दारु पिण्याचे व्यसन लागले होते. मंगळवारी २७ ऑगस्टला सकाळी सात वाजता तो घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. त्याचा त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्याचा शोध सुरु असतानाच बुधवारी सायंकाळी राहुल हा कांदिवलीतील भूमी हिल्स, फरीद इस्टेटजवळील खदानाजवळ मृतावस्थेत सापडला होता. ही माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. आजाराला कंटाळून घरातून निघाल्यानंतर तो खदानाजवळ आला आणि तिथे त्याने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यांनी कोणावरही संशय व्ये केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. राहुलच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड हळहळ व्ये होत आहे.