कापड व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
व्यवसायाचे २५ लाख न देता शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मे महिन्यांत कांदिवली परिसरात नरेंद्र राजेंद्र सोनकर या ३७ वर्षांच्या कापड व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी दोन व्यावसायिकाविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिराग करसन सावला आणि केतन करसन सावला अशी या दोघांची नावे आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी नरेंद्रने एक व्हिडीओ बनविला होता, त्यात त्यांनी सावला बंधूंकडून त्यांना २५ लाख रुपये येणे बाकी होते, मात्र वारंवार पैशांची मागणी करुनही त्यांनी पेमेंट न केले नाही. शिवीगाळ करुन धमकी देऊन त्यांचे मानसिक शोषण केले, त्यातून आलेल्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असून त्याला सावला बंधूच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओनंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही बंधूंविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
३७ वर्षांची ममता सोनकर ही महिला मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिचे पती नरेंद्र सोनकर हे कापड व्यापारी असून गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा पॅण्ट बनविण्याचा व्यवसाय होता. पूर्वी त्यांचा व्यवसाय मालवणी परिसरात सुरु होता. मात्र नंतर त्यांनी कांदिवलीतील गणेशनगर, आझाद कंपाऊंड परिसरात खुर्शी गारमेंट नावाने त्यांचा व्यवसाय सुरु केला होता. तिथे ५५ ते ६० कामगार कामाला होते. त्यांचा चिराग आणि केतन सावला यांच्या जेजे ५६ या कंपनीसोबत व्यवहार होता. या कंपनीला ते तयार पॅण्ड पीस तयार करुन पाठवत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना सावला बंधूंकडून सुमारे २५ लाख रुपये बाकी होते. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून पेमेंट येत नव्हते. अनेकदा काम पूर्ण करुन सावला बंधू त्यांना वीस टक्के पेमेंट देत होते. मात्र उर्वरित पेमेंट देताना टाळाटाळ करत होते. त्यातून त्यांना काही कर्ज झाले होते. त्यांना त्यांच्या कामगारांचे पगार, शॉपचा भाडा आणि इतर खर्चासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. व्यवसायासाठी त्यांनी विविध बँकेसह अर्थपुरवठा करणार्या खाजगी कंपन्यांकडून सुमारे ६१ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी तीस लाखांच्या कर्जाची त्यांनी परतफेड केली होती, मात्र उर्वरित कर्जाचे हप्ते भरताना त्यांना बर्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे ते पेमेंटसाठी सतत सावला बंधूंकडून विचारणा करत होते.
मात्र ते दोघेही त्यांना शिवीगाळ करुन धमकी देत होते. पेमेंट देणार नाही, तुला काय करायचे आहे असे बोलून त्यांचा मानसिक शोषण करत होते. या कारणावरुन नरेंद्र हे काही दिवसांपासून मानसिक तणवात होते. ३१ मे २०२४ रोजी ते नेहमीप्रमाणे कांदिवलीतील कार्यालयात गेले होते. दुपारी जेवणासाठी नरेंद्र घरी आले नाही म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना कॉल केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जवळपास २५ ते ३० कॉल करुनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ममता ही प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने कांदिवलीतील कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तिला तिचे पती नरेंद्र यांनी तिथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहिल्यांनतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. नरेंद्रच्या आत्महत्येनंतर सोनकर कुटुंबिय त्यांच्या उत्तरप्रदेशातील फतेहपूर, हुसेनगंज येथील गावी निघून गेले होते. याच दरम्यान नरेंद्रचा मित्र शकील याने तिला एक व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ तिच्या पतीचा होता.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तो व्हिडीओ बनविला होता. त्यात त्यांनी चिराग आणि केतन सावला या दोन बंधूंकडून त्यांना व्यवसायाचे २५ लाख रुपये येणे बाकी होते, वारंवार पैशांची मागणी करुनही ते पैसे देत नव्हते. पैशासाठी ते दोघेही त्यांचा मानसिक शोषण करत होते, त्यांना शिवीगाळ व धमकी देत होते. या घटनेने ते मानसिक तणावात आले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येला ते दोघेच जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ममता सोनकर हिने कांदिवली पोलिसांना हा व्हिडीओ देऊन चिराग आणि केतन सावला या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर सावला बंधूविरुद्ध पोलिसांनी नरेंद्रला आत्महत्येस प्रवृत्त करणे, शिवीगाळ करुन धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.