मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – वाहनासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरता येत नसल्याने कंपनीकडून केल्या जाणार्या कॉलमुळे मानसिक नैराश्यात असलेल्या सुरज अमृतलाल जयस्वाल नावाच्या एका २७ वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी चोलामंडल या अर्थ पुरवठा करणार्या कंपनीचा कर्मचारी विजय धुराजी ओहाळ याच्याविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून विजय ओहाळची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेला सुनिल अमृतलाल जयस्वाल हा त्याच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील डहाणूकरवाडी, नेताजीनगरात राहतो. सुरज हा त्याचा लहान भाऊ तो कांदिवलीतील आकुर्ली रोड, गोकुळनगर, सेवानंद चाळीत राहत होता. त्याने चोलामंडल या अर्थपुरवठा करणार्या कंपनीतून वाहनकर्ज घेऊन तीन वाहनांची खरेदी केली होती. त्यात बजाज मॅस्किमा सीएनजी कार्गो, अशोक लिलँड दोस्त आणि आयसर वाहनांचा समावेश होता. कर्ज घेताना त्याने त्याच्या भावाला जामिनदार म्हणून ठेवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सुरजकडून वाहन कर्जाचे हप्ते भरले जात नव्हते. त्यामुळे त्याला कंपनीचा कर्मचारी विजय ओहाळ हा सतत कॉल करत होता. कंपनीकडून सतत येणार्या कॉलमुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. त्यामुळे त्याने कर्ज काढून घेतलेले वाहन पुन्हा कंपनीकडे जमा करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्याने त्याच्या भावाला सांगितले होते.
मात्र मात्र वाहन घेण्यासाठी कंपनीचे कोणीही कर्मचारी तिथे आले नव्हते. मंगळवारी ३१ डिसेंबरला सुरजने त्याच्या कांदिवलीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे सुनिल हा त्याच्या कुटुंबियांसोबत तिथे गेला होता. शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या सुरजला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. कर्जाचे हप्ते न भरल्यानंतर त्याला कंपनीचा रिकव्हरी कर्मचारी विजय ओहाळ याच्याकडून सतत विचारणा होत होती. त्याला कंटाळून सुरजने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविले होते. याप्रकरणी सुनिलची कुरार पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली होती. त्यात त्याने सुरजच्या आत्महत्येला विजय ओहाळ हाच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा कुरार पोलिसांकडून तपास सुरु आहे.