मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – नशेच्या आहारी गेलेल्या एका 20 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. धीरज मुक्तार राजभर असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने घराजवळील एका झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही.
धीरज राजभर हा कांदिवलीतील क्रांतीनगर, सिद्धीविनायक चाळीत राहत होता. त्याचे वडिल आणि दोन्ही बहिणी हार विक्रीचे काम करत होते. मात्र धीरज हा काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला नशा करण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्याला तीन ते चार वेळा नशा मुक्ती केंद्रात पाठविण्यात आले होते. मात्र नशा मुक्ती केंद्रातून घरी आल्यानंतरही तो नशा करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला पैसे नसल्याने नशा करता येत नव्हते. त्यामुळे तो मानसिक नैराश्यात होता.
मंगळवारी दुपारी तीन वाजतात्याने कांदिवलीतील लोखंडवाला कंपाऊंडमागील एका झाडाला नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार तेथून जाणार्या एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने समतानगर पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकशीअंती त्याचे नाव धीरज राजभर असल्याचे उघडकीस आले.
ही माहिती नंतर त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र त्याच्या वडिलांच्या जबानीतून धीरज हा नशेच्या आहारी गेला होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे जबानीत म्हटले आहे. त्याच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी कोणावरही आरोप केला नाही किंवा संशय व्यक्त केला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. नशेमुळे वीस वर्षांच्या धीरजच्या आत्महत्येच्या वृत्ताने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.