हुंड्यासाठी होणार्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासूविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जुलै 2025
मुंबई, – हुंड्यासाठी सतत होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून रेणू बापू कटारे या 42 वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली. कांदिवलीतील राहत्या घरी गळफास घेऊन तिने स्वतचे जीवन संपविले. याप्रकरणी रेणूच्या भावाच्या तक्रार अर्जावरुन समतानगर पोलिसांनी तिचा पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बापू शिवाजी कटारे आणि सासू यमाबाई शिवाजी कटारे अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर रेणूचा हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांची चौकशी सुरु असल्याने अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रेणु ही तिच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील लोखंडवाला, सिल्व्हर ओक अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचे बापूसोबत लग्न झाले होते, तो सध्या म्हाडामध्ये नोकरीस आहे. लग्नानंतर बापू व त्याची आई यमाबाई हे दोघेही हुंड्यासाठी रेणूचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होते. तिला सतत शिवीगाळ, टोमणे मारुन मारहाण केली जात होती. या छळाला ती कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने शनिवारी सायंकाळी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर तिच्या पतीला समजताच त्याने समतानगर पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी रेणूला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आत्महत्येपूर्वी तिने तिच्या फॅमिली डॉक्टरांना कॉल केला होता. यावेळी तिने तिच्या सासरच्या मंडळीकडून तिचा हुंड्यासाठी छळ सुरु असल्याचे सांगितले होते, त्यानंतर तिचा फोन बंद झाला होता. या घटनेनंतर डॉक्टरांनी ही माहिती रेणूचा भाऊ सचिन सेजलला दिली होती. सचिन हा पुण्यात राहत असल्याने तो रात्री उशिरा मुंबईत आला होता. यावेळी त्याला रेणूने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. ही माहिती ऐकून त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
याप्रकरणी त्याची समतानगर पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीत रेणूचा पतीसह सासूकडून हुंड्यासाठी छळ सुरु असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करुन सचिनने त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रेणूचा पती बापू आणि सासू यमाबाई यांच्याविरुद्ध पोलिसांनी हुंड्यासाठी छळ करुन रेणूला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.