मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – स्वतच्या घरी चोरीचा सल्ला देऊन अल्पवयीन मुलाने दिलेल्या सुमारे पाच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात चार हजार रुपये देऊन त्याची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराच्या सोळा वर्षांच्या मुलासह त्याच्या मित्राविरुद्ध कांदिवली पोलिसांनी चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत दिपक रमेश कविठिया याला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून लवकरच चोरीचे सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले जाणार आहे.
५० वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांची पत्नी नोकरी करते तर त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा सोळा वर्षांचा लहान मुलगा गोविंद (नावात बदल) हा कांदिवलीतील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीमध्ये शिकतो. २८ नोव्हेंबरला त्यांच्या पत्नीला कपाटातील लॉकरमधील सुमारे पाच लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने मिळून आले नाही. त्यामुळे तिने गोविंदकडे विचारणा केली होती. त्याच्याकडे काही दिवसांपासून पैसे असल्याचे तिने पाहिले होते. या पैशांबाबत विचारणा केल्यानंतर त्याला चार हजार रुपये ढोलताशे वाजवून मिळाल्याचे सांगितले. मात्र तो सांगत असलेली माहिती विसंगत असल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने त्याला दम देताच त्याने घरातील सोन्याचे दागिने ढोल वाजविणारा त्याचा मित्र दिपक कविठिया याला चार हजारांना विक्री केल्याचे सांगितले. त्यापैकी दोन हजार रुपये त्याने तिला दिले होते तर उर्वरित दोन हजार त्याने स्वतवर खर्च केले होते.
दिपक हा ढोल वाजविण्याचे काम करत असून सध्या कांदिवलीतील चारकोप, बंदरपाखडी, दोस्ती इमारतीजवळील चाळीत राहतो. त्याने त्याला घरातील दागिने चोरी करण्याचा सल्ला दिला होता. १ सप्टेंबरला तो त्याच्या घरी आला आणि त्याने कपाटातील लॉकरमधून सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने चोरी करुन दिपकला दिले होते. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्याने त्याला चार हजार रुपये दिले होते. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी त्यांच्या सोळा वर्षांच्या मुलासह ४० वर्षांचा दिपक कविठिया याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीसह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. गुन्हा दाखल होताच दिपक कविठिया याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गोविंदला पैशांची गरज असल्याने तो सतत त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळेच त्यानेच त्याला त्याच्या घरी चोरी करण्याचा सल्ला देऊन सोन्याचे दागिने आणण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे तो सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने घेऊन आला. त्यानंतर त्याने सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात त्याला चार हजार रुपये दिले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.