मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – कांजूरमार्ग येथे राजेश मनबिरसिंग सारवण या ४१ वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने डोक्यत जड वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. हत्येनंतर मारेकर्याने घटनास्थळाहून पलायन केले असून त्याच्याविरुद्ध कांजूरमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
रविवारी १९ जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजता कांजूरमार्ग येथील सर्व्हिस रोड, कांजूर मेट्रो कारशेडजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला आहे अशी माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाला होता. ही माहिती नंतर कांजूरमार्ग पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यात मृत व्यक्तीच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण करण्यात आली होती. डोक्याला गंभीर दुखापतीसह अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.
अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह तिथेच टाकून पलायन केले होते. शवविच्छेदन अहवालानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश अशोकमाळी यांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे नाव राजेश सारवण असल्याचे उघडकीस आले. तो अंधेरीतील चकाला रोड, पीपीडीजवळील वाल्मिकी रहिवाशी संघाचा रहिवाशी आहे. त्याची हत्या कोणी आणि का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यासह नातेवाईक आणि मित्रांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून काही माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या अज्ञात मारेकर्याचा पोलीस शोध घेत आहेत.