कांजूरमार्ग येथील हत्येचा पर्दाफाश करुन तिघांना अटक
चुलत भावानेच मित्रांना दिली होती तीन लाखांची सुपारी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – कांजूरमार्ग येथे राजेश मनबिरसिंग सारवण या ४१ वर्षांच्या व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर कांजूरमार्ग पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आहे. याप्रकरणी राजेशच्या चुलत भावासह दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. विजय ईश्वर सारवान, रोहित राजेश चंडालिया आणि सागर राजेश पिवाळ अशी या तिघांची नावे आहेत. यातील विजय हा मृत राजेशचा चुलत भाऊ असून त्याने त्याच्या दोन मित्रांना राजेशच्या हत्येची तीन लाखांची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दारुच्या नशेत राजेशकडून कुटुंबातील सदस्यांना सतत शिवीगाळ आणि मानसिक त्रास होत असल्याने त्याची हत्या घडवून आणण्यात आली होती.
रविवारी १९ जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजता कांजूरमार्ग येथील सर्व्हिस रोड, कांजूर मेट्रो कारशेडजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला आहे अशी माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाला होता. ही माहिती नंतर कांजूरमार्ग पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यात मृत व्यक्तीच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण करण्यात आली होती. डोक्याला गंभीर दुखापतीसह अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह तिथेच टाकून पलायन केले होते. शवविच्छेदन अहवालानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश अशोक माळी यांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येचा कांजूरमार्ग पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हा तपास सुरु असताना ईश्वर सारवान याला कांजूरमार्ग पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
ईश्वर हा मृत राजेशचा चुलत भाऊ असून त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. राजेशला दारु पिण्याचे व्यसन होते, अनेकदा मद्यप्राशन करुन तो घरात शिवीगाळ करुन भांडण करत होता. राजेशच्या बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी त्याचे ईश्वरसोबत प्रचंड वाद झाला होता. त्याचा ईश्वरच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने या दोघांचा मित्र रोहित आणि सागर यांना राजेशच्या हत्येची सुपारी दिली होती. हत्येनंतर त्यांना तीन लाख रुपये देण्याचे आश्वाशन देण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे १९ जानेवारीला रोहित आणि सागर हे दोघेही राजेशला दारु पाजण्याचा बहाणा करुन करुन कांजूर मेट्रो कारशेडजवळ आले होते. तिथेच त्यांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांनी राजेशची जड वस्तूने डोक्यात मारहाण करुन हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून पलायन केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर दोन्ही मारेकर्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सातचे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, दहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे, धनाजी साठे, मधुकर धुतराज, संग्राम पाटील, राहुल प्रभू, सचिन गावडे, उत्कर्ष वझे, रोहित नार्वेकर, पूनम यादव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, विकास मोरे, कानडे, बाळासाहेब शिंदे यांच्यासह अन्य पोलीस पथकाने दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रोहित आणि सागर या दोघांना पोलिसांनी अटक केली.
चौकशीत या दोघांनी राजेशची मद्यप्राशन करुन हत्या केल्याची कबुली दिली. त्यासाठी त्यांना ईश्वरनेच तीन लाखांची हत्येची सुपारी दिली होती. या कबुलीनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी कांजूरमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यातील रोहितविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांत राजेश हा पंच होता. या गुन्ह्यांत राजेश त्याच्या विरोधात गेला होता. त्याचा रोहितला राग होता. त्यामुळे त्याने त्याच्या चुलत भावाकडून राजेशच्या हत्येची सुपारी घेतली होती. ठरल्याप्रमाणे त्याने त्याला दारु पाजून नंतर त्याची हत्या केली होती.