मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
काशिमिरा, – गुंगीचे औषध देऊन लुटमार करणार्या एका रेकॉर्डवरील आरोपीस काशिमिरा युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अविनाश ऊर्फ अभिषेक सत्यनारायण अग्रवाल असे या 38 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिरारोड येथील शांतीपार्क, एमटीएनएल रोडवर अॅव्हेन्यू नावाचे एक लॉजिंग आहे. 14 मार्च 2025 रोजी या लॉजिंगमध्ये अविनाश नावाच्या एका व्यक्तीला अज्ञात व्यक्तीचे गुंगीचे औषध दिले होते. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याची चैन, दोन अंगठ्या आणि कॅश असा 81 हजाराचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. शुद्धीवर आल्यानंतर अविनाशने घडलेला प्रकार मिरारोड पोलिसांना सांगितला होता. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी भाईंदर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमिरा युनिटचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संतोष लांडगे, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, आश्विन पाटील, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे, मसुब सचिन चौधरी सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी भाईंदर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या अविनाश अग्रवाल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली.
चौकशीत अविनाश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दहिसर, नवघर, भाईंदर, मिरारोड पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मिरारोड पोलिसांकडे सोपविण्यात आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.