मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जानेवारी २०२५
मुंबई, – फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करुन एका फेरीवाल्याला चौकशीकामी पोलीस ठाण्यात आणले म्हणून एका वयोवृद्धाने पोलीस ठाण्यात पोलिसांना शिवीगाळ करुन एका पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी दिपक मोहनलाल गोराडिया या ६३ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिपकला ३५ (३) बीएनएस अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले. दिपकने पोलीस ठाण्यातच पोलिसांवर गंभीर आरोप करताना त्यांना शिवीगाळ केली, पोलीस शिपायाला मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संतोष वसंत पवार हे विरार येथे राहत असून कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी काही फेरीवाल्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुशील गुप्ता या फेरीवाल्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. त्यामुळे तिथे दिपक गोराडिया हा आला होता. त्याने सुशीलवर कारवाई करु नये, त्याला तातडीने सोडून द्या असे सांगून पोलिसांना शिवीगाळ घालण्यास सुरुवात केली. तुम्हारी औंकात नही, तुम सब लुक्के लोग हो, तुम्हारे जैसे कितने पोलीसवाले आये और गये असे सांगून त्यांना आई-बहिणीवरुन शिवीगाळ सुरु केली.
यावेळी संतोष पवार हे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयाच्या जात असताना त्याने त्यांच्या मानेवार जोरात फटकामारला होता. त्यांना जिवे मारण्यासह त्यांची वर्दी उतरविण्याची धमकी दिली होती. तिथे उपस्थित पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन करुनही तो पोलिसांना सतत शिवीगाळ करत होता. सार्वजनिक शांततेचा भंग करुन त्याने सरकारी कर्मचार्यावर मारहाण केला तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दिपक गोराडिया यांनी पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ घालून पोलिसांवर विविध गंभीर आरोपासह शिवीगाळ केल्याने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संतोष पवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांी दिपक गोराडिया याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.