ज्वेलर्स दुकानातील 72 लाखांच्या चोरीप्रकरणी नोकराला अटक
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 सप्टेंबर 2025
मुंबई, – नवी मुंबईतील कामोठे परिसरातील पारसनाथ ज्वेलर्समधील सुमारे 72 लाखांच्या विविध सोन्याचे दागिने, हिरे आणि कॅश असा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या नोकराला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. करणसिंह नाथूसिंह खारवार असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या अटकेनंतर या चोरीचा पर्दाफाश झाला होता. त्याच्या अटकेनंतर कामोठे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर करणसिंग हा त्याच्या राजस्थान येथील गावी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला चोरीच्या मुद्देमालासह पुढील चौकशीसाठी कामोठे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक धीरज वायकोस यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांनी परिसरात जास्तीत जास्त गस्त आणि नाकाबंदीवर भर दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज वायकोस, अनिकेत शिंदे, पोलीस हवालदार राजेश पेडणेकर, करुणेश म्हात्रे, पोलीस शिपाई महांतेश सवळी, तुषार पुजारी, अनिकेत सकपाळ, अमोल फोपसे, राहुल सांगळे, विकेश शिंगटे, महादेव पुरी, राहुल वडर आणि प्रविण फर्डे आदींनी परिसरात गस्तसह नाकाबंदीवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. संशयित प्रत्येक व्यक्तीसह त्याच्या सामानाची या पथकाकडून तपासणी करण्यात येत होती.
शनिवारी कस्तुबा मार्ग पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी बोरिवली रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. यावेळी एक तरुण तिथे संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांना दिसून आला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक धीरज वायकोस व इतर पोलीस पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना 78 तोळे सोन्याचे दागिने, अठरा छोटे हिरे आणि 1 लाख 39 हजार 200 रुपयांची कॅश सापडली. या दागिन्यासह हिरे आणि कॅशबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित मुद्देमाल पारसनाथ ज्वेलर्स दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली.
तपासात करणसिंह हा मूळचा राजस्थानच्या राजसमंदचा रहिवाशी आहे. तो नवी मुंबईतील कामोठे परिसरातील पारसनाथ ज्वेलर्स दुकानात कामाला होता. तिथे काम करताना त्याने शनिवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान दुकानातील सोन्याचे दागिने, हिरे आणि कॅश असा सुमारे 72 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. चोरीनंतर तो त्याच्या गावी जाण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकात आला होता, मात्र गावी जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी चोरीच्या सर्व मुद्देमालासह अटक केली. या चोरीबाबत नंतर कामोठे पोलिसांना माहिती देण्यात आली.
यावेळी ज्वेलर्स मालकाला त्यांच्या दुकानात झालेल्या चोरीबाबत समजले होते. त्यानंतर त्यांच्या तक्रारीनंतर कामोठे पोलिसांनी करणसिंह याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत करणसिंहला नंतर कामोठे पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्याच्याकडील सर्व चोरीचा मुद्देमाल पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.