नवीन कायद्यासह सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती मोहीम
वर्सोवा पोलिसांच्या निर्भया पथकाकडून विविध उपक्रमाचे आयोजन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – नवीन कायद्यासह सायबर गुन्हे तसेच इतर कायद्याची माहितीसाठी वर्सोवा पोलिसाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी निर्भया पथकाकडून विविध शाळा अणि कॉलेजमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यत आले होते. रॅली काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. या कार्यक्रमाला शाळा-कॉलेजमधील शिक्षकासह विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.
सर्वसामान्य नागरिकांना नवीन कायदे, वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती होण्यासाठी अलीकडेच वर्सोवा पोलिसांकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यातील विविध शाळा आणि कॉलेजमध्ये वर्सोवा पोलिसांनी घेतलेल्या उपक्रमाला लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ४ फेब्रुवारीला अंधेरीतील वेसावे विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे निर्भया पथकाने नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जगताप, महिला पोलीस शिपाई वावरे, गायकवाड यांनी शिक्षकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले होते. त्यात नव्याने लागू कायद्याबाबत माहिती देऊन कायद्यात झालेल्या सुधारणा, नवीन कायद्यानुसार वर्गीकरण करण्यात आलेल्या शिक्षेबाबत माहिती, ई एफआयआर करण्याबाबतची कार्यपद्धती, महिलांवर होणार्या अत्याचाराबाबत नवीन कायद्यांत करण्यात आलेल्या सुधारणा, सायबर क्राईमबाबतची माहिती आणि त्यासाठी सायबर हेल्पलाईन व निर्भया पथकाची माहिती देण्यात आली होती.
४ फेब्रुवारीला वर्सोवा वेल्फेअर हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजच्या नववीच्या २८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. से नो टू ड्रग्ज या विषयावर पथनाट्य सात बंगला चौकी व वटेश्वर नाका येथे सादर करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस तसेच पोलीस विभागातील विविध पदांबाबत माहिती, अमली पदार्थाचे सेवन न करण्याविषयी सूचना, महिलांसह बालकांवर होणार्या अत्याचाराची माहिती, वाहूक नियमांची माहिती आदींवर रॅली काढून जनजागृती करण्यात आली होती. या कार्यक्रमाचेआयोजन पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव करपे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक दाभोळकर, पोलीस निरीक्षक सतीश इंगळे, पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जगताप, पोलीस शिपाई बोबडे, पोलीस शिपाई उकिरडे, पोलीस शिपाई जाधव यांनी केले.
त्यापूर्वी अंधेरीतील जानकीदेवी पब्लिक स्कूलमध्ये पोलिसांनी शिक्षकासह विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यात ७५० हून अधिक विद्यार्थी, तेरा शिक्षक आदी उपस्थित होते. महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जगताप आणि पोलीस शिपाई लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांना निर्भया पथकाची माहिती, स्वसंरक्षणाबाबत मौल्याचे मार्गदर्शन, महिला अत्याचारासह अज्ञात व्यक्तीकडून कुठलीही वस्तू न घेण्याबाबत सूचना, विनाकारण भांडण करुन मारामारी न करणे, सोशल मिडीया वापरताना घ्यायची काळजी, निर्भया हेल्पलाईन १०३, चाईल्स लाईन १०९८ ची माहिती, बुली आणि बॉडी शेमिंग न करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी कोमल शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली होती.
अशाच प्रकारे वर्सोवा वेल्फेअर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या ३४० विद्यार्थ्यांसाठी दिदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जगताप, पोलीस शिपाई वावरे, सोनाली जगताप यांनी सायबर गुन्ह्यांसह मोबाईलचे लिमिटेड वापराबाबत माहिती दिली. कॉलेमध्ये लावण्यात आलेल्या तक्रारी पेट्याबाबत माहितीसह नवीन कायद्यांची माहिती, पोक्सो आणि जे जे ऍक्ट माहिती, लव अफेअरसह आकर्षणांना बळी न पडण्याच्या सूचना केल्या होत्या. या सर्व कार्यक्रमांला शाळेसह कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून कार्यशाळेचे आयोजन
अशाच प्रकारे कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बोरिवलीतील मागाठाणे पोलीस हॉल येथे एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. २९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक जाधव, वसावे यांच्यासह पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. भारतीय न्याय सहिता, भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांचे प्रसार आणि प्रसिद्धीसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मागाठाणे परिसरातील सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. यावेळी अभियोक्ता विनायक गायकवाड आणि संदीप आंग्रे यांनी कायद्याबाबत मौलाचे मार्गदर्शन केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी विशेष परिश्रम घेतले होते. कार्यक्रमांला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबाबत पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांचे कौतुक केले होते.