मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून खंडणी वसुली
म्हाडाच्या उपअभियंता महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – आधारकार्डसह पॅनकार्डच्या मदतीने बँकेत खाते उघडून लाखो रुपये जमा झाल्याचा आरोप करुन मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून म्हाडाच्या अभियंता महिलेची चारजणांच्या टोळीने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अटकेची भीतीने दाखवून या चौघांकडून तिच्याकडून सुमारे तीन लाखांची खंडणी वसुली केली होती. याप्रकरणी रवी दहिया, संजय सिंग, गणेश गायतोंडे आणि विजयन नाव सांगणार्या चौघांविरुद्ध खैरवाडी पोलिसांनी फसवणुकीसह खंडणीसाठी धमकी देणे व आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
४१ वर्षांची तक्रारदार महिला प्रतिक्षानगरात राहत असून म्हाडामध्ये उपअभियंता म्हणून नोकरी करते. ८ नोव्हेंबरला ती तिच्या कार्यालयात काम करत होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याचे नाव रवी दहिया असल्याचे सांगितले. तो टेलिकॉम ऍथोरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक बंद होणार आहे. तुमच्या नावाने एक सिमकार्ड घेण्यात आले असून या सिमकार्डवरुन काही लोकांना अश्लील मॅसेज पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्याने तिचा कॉल दुसर्या व्यक्तीकडे ट्रान्स्फर केला होता. या व्यक्तीने स्वतचे नाव संजय सिंग सांगितले. त्याने तिच्या आधारकार्डचा अनधिकृत वापर होत असल्याचे सांगून तिच्या व्हॉटअप एक मॅसेज पाठविला होता. त्यानंतर त्याने तिला व्हिडीओ कॉल केला.
या कॉलदरम्यान त्याने तो सायबर सेल विभागाकडून बोलत असल्याचे सांगितले. त्याचे वरिष्ठ अधिकारी गणेश गायतोंडे तिच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गणेशने तिला पूजा म्हात्रे या महिलेने तीनशे कोटीचा मनी लॉड्रिंगचा गुन्हा केला आहे. लग्नापूर्वी तिच्या नावाने एका बँकेत खाते उघडण्यात आले होते. या खात्यात याच मनी लॉड्रिंगचे २६ लाख २८ हजार रुपये ट्रान्स्फर झाले होते. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असून कोणत्याही क्षणी तिला अटक होणार असल्याची भीती दाखविली होती. या माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर गणेशसह विजयन नावाच्या व्यक्तीने तिच्या बँक खात्याची माहिती काढून तिला या कारवाईपासून वाचायचे असेल तर त्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. तिला वेगवेगळ्या बँक खात्यात तीन लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले.
हा प्रकार नंतर तिने तिच्या पतीला सांगितला. त्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने खेरवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित चार ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.