बोगस ठरावाचे दस्तावेज बनवून ६३ कोटीची फसवणुक

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बोगस आणि खोटा ठरावाचे दस्तावेज बनवून एका वयोवृद्ध विकासकाची त्याच्या पार्टनर कंपनीने सुमारे ६३ कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वसंतराज मेधराज सेठिया, अक्षय हिराचंद कोठारी आणि रितेश प्रदीप ओंबाळकर या तिघांची नावे असून ते तिघेही सेठिया इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

६२ वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार वामन रामचंद्र मांडये हे त्यांची पत्नी आणि तीन मुलांसोबत वांद्रे येथील निर्मलनगर, साईकृपा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची एक विवाहीत मुलगी सध्या कॅनडा येथे वास्तव्यास आहे. त्यांची राजहंस बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स नावाची एक खाजगी कंपनी असून ही कंपनी गेल्या वीस वर्षांपासून इमारत बांधकाम करण्याचे काम करते. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी २००६ साली पार्टनरशीप फर्म स्थापन केली होती. त्यात त्यांच्यासोबत श्यामजी तेजशी पटेल आणि रितेश श्यामजी पटेल हे भागीदार आहेत. कंपनीने वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात काही प्रॉपटी विकसित करण्यासाठी घेतली होती. यातील काही प्रॉपटीमध्ये त्यांच्या कंपनीच्या वतीने एसआरए प्रोजेक्ट सुरु होणार होते. या प्रॉपटीवर बसंतराज सेठीया यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असून त्यांनी त्याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिसंात तक्रार केली होती. याच दरम्यान त्यांच्या कंपनीने विशाल आशियाना नावाच्या सात मजली दोन इमारती बांधल्या असून त्यातील एक इमारत पुनर्वसित तर दुसरी इमारत विक्रीसाठी असून त्याची विक्री केली आहे. ही प्रॉपटी विकसित करण्यासाठी त्यांच्या कंपनीला गुंतवणुकदाराची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. २०१० साली बसंतराज सेठीया यांनी त्यांना संपर्क साधून त्यांच्यासोबत पार्टनरशीपमध्ये प्रॉपटी विकसित करण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यास वामन मांडये तयार होते, मात्र त्यांचे पार्टनर श्यामजी पटेल आणि रितेश पटेल यांनी त्यांचा हिस्सा विक्रीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बसंतराज सेठीया यांनी या दोघांचा हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

जानेवारी २०१० त्यांच्यात तसा एमओयू तयार करण्यात आला. त्यात प्रॉपटीची त्यांच्या मालकीची तर विकासाठी लागणारा सर्व खर्च सेठीया इन्फास्ट्रक्चर पुरविणार. सर्व खर्च वजा करुन येणार्‍या नफ्यातून तीस टक्के सेठीया तर सत्तर टक्के हिस्सा त्यांचा असेल असे नमूद करण्यात आले होते. त्यापूर्वी बसंतराज सेठिया त्यांना दहा कोटी रुपये देणार होते. त्यापैकी साडेतीन कोटी त्यांनी दिले मात्र उर्वरित पेमेंट केले नाही. साडेचार कोटीतून त्याने दोन कोटी पाच लाख रुपये विकासकामाचा खर्च म्हणून घेतला. याच दरम्यान श्यामजी आणि रितेश पटेल त्यांच्या कंपनीतून निवृत्त होऊन बाहेर पडले होते. त्यांचा संपूर्ण हिस्सा अक्षय कोठारी यांनी विकत घेतली होती. कालातंराने बसंतराज सेठिया यांनी अक्षय कोठारी आणि रितेश ओंबाळकर यांच्या मदतीने बोगस ऍडमिशन कम रिटायरमेंट डिड तयार करुन त्याद्वारे त्यांना स्वराज असोशिएटमून निवृत्त करुन सेठीया कंपनीला नवीन भागीदार म्हणून समावेश केला होता. या बोगस दस्तावेजाचा वापर वांद्रे येथील चेतना कॉलेजवळील नवीन प्रशासकीय इमारत, रजिस्ट्रार ऑफ फर्म यांच्या कार्यालयात करुन स्वतच्या नावाने रजिस्ट्रेशन केले होते. २०१४ साली हा प्रकार वामन मांड्ये यांच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मार्च २०१६ यांच्यासोबत बोलणी सुरु केली होती. मात्र बसंतराज सेठीयाने एका प्रॉपटी पत्रकातून त्यांचे नाव कमी त्यांची पुन्हा फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी ही सर्व माहिती काढण्याचा प्रयत्न केला.

कोरोना काळात दोन वर्षांत त्यांना काही माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र नंतर त्यांनी काही कागदपत्रे प्राप्त केले होते. त्यात या तिन्ही आरोपींनी बोगस आणि खोटा ठरार करुन एमओयू, करारनामा करुन व काही मोबादला देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर अन्यायाने विश्‍वासघात करुन फसवणुकीद्वारे त्यांची स्वाक्षरी घेऊन बोगस डिड ऑफ रिटायरमेंट तयार केले. तसेच बोगस दस्तावेज तयार करुन संबंधित कागदपत्रे रजिस्ट्रेशन केले होते. अशाच प्रकारे या तिघांनी वामन मांड्ये यांची ६३ कोटी रुपयांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी निर्मलनगर पोलिसात त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांकडून त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी बसंतराज सेठीया, अक्षय हिराचंद कोठारी आणि रितशे ओंबाळकर यांच्याविरुद्ध ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, १२० बी ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्ह्यांचे सर्व कागदपत्रे संबंधित विभागाला सोपविण्यात आले असून तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसाांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page