प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवारावर चाकूने प्राणघातक हल्ला
वांद्रे येथील हल्ल्याच्या घटनेने प्रचंड तणावाचे वातावरण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जानेवारी 2026
मुंबई, – प्रचारादरम्यान शिवसेनेचे वांद्रे येथील अधिकृत उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या हाजी कुरेशी यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. राजकीय वैमस्नातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. दरम्यान या हल्ल्याच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगरातील एका गल्लीत घडली. हाजी कुरेशी हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 92 चे अधिकृत उमेदवार आहेत. त्यापूर्वी ते एमएमआयएमचे मुंबई शहर सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. सप्टेंबर 2024 साली त्यांनी एमएमआयएमचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांची पत्नी गुलनाज कुरेशी या वाडॅ क्रमांक 92 च्या माजी नगरसेविका आहेत. याच वॉर्डमधून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती. या उमेदवारीनंतर त्यांनी परिसरात जोरदार प्रचार सुरु केला होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजता ते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत संत ज्ञानेश्वर नगरातील एका गल्लीतून प्रचारादरम्यान फिरत होते.
याच दरम्यान तिथे एक तरुण आला आणि काही कळण्यापूर्वीच त्याने हाजी कुरेशी यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. हा प्रकार नंतर काही कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या हाजी यांना तातडीने जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. ही माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रचारादरम्यान एका उमेदवारावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
राजकीय पूर्ववैमस्नातून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.