मेडीकल शॉपसह गुंतवणुकीच्या आमिषाने महिलांची फसवणुक
३४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – आयुवैदिक हॉस्पिटलमध्ये मेडीकल शॉप भाड्याने देतो तसेच हॉटेल व स्पोटर्स दुकानातील गुंतवणुकीवर वीस टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची ३४ लाख ५४ हजार रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही भामट्याविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी अपहारासह फसवुणकीचा गुन्हा दाखल केला आहे. महेश चंद्रकांत सावंत आणि अमोल मुकूंद पांचाळ अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
गार्गी विनायक देसाई ही ४९ वर्षीय महिला कांदिवली परिसरात राहत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. तिची नणंद ज्योती सचिन पवार ही वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात कामाला असून तिनेच तिची ओळख त्यांच्या कार्यालयात कामाला असलेल्या महेश सावंतशी करुन दिली होती. महेशने त्यांची ओळख अमोल पांचाळशी करुन देताना त्याच्या मालकीच्या पनवेल येथे एक आयुवैदिक हॉस्पिटलचे बांधकाम सुरु आहे. या हॉस्पिटलमध्ये एक मेडीकल शॉप असून या शॉपची विक्रीची जबाबदारी त्याने महेशवर सोपविल्याचे सांगितले. तसेच मुकूंदच्या मित्रांचा एक गु्रप असून ते दादर येथे हॉटेल आणि स्पोटर्स दुकान भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यासाठी त्यांना काही गुंतवणूकदारांची गरज आहे. या गुंतवणुकीवर त्यांना वीस टक्के कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे गार्गी देसाई व तिची नंणद ज्योती पवार यांनी त्यांच्याकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
संपूर्ण गुंतवणुक योजनेची माहिती घेतल्यानंतर गार्गी आणि तिचे पती विनायक देसाई यांनी त्यांच्याकडे जानेवारी २०२० रोजी सुमारे सतरा लाख तर ज्योती पवार हिने साडेसतरा लाखांची गुंतवणुक केली होती. याच दरम्यान कोव्हीडमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. हॉस्पिटलमध्ये बांधकाम थांबले असून हॉटेल आणि स्पोटर्स दुकान सुरु करता आले नाही असे सांगून त्यांनी त्यांना गुंतवणुकीवरील परतावा देणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. या दोघांकडून त्यांना मूळ आणि व्याजासहीत त्यांना २६ लाख ५० हजार येणे बाकी होते. मात्र ही रक्कम त्यांनी हॉस्पिटलमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना पुन्हा पैसे देण्यास थोडा वेळ लागेल असे सांगून त्यांनी त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांना त्यांच्या आयुवैदिक हॉस्पिटलमध्ये मेडीकल शॉप सुरु करण्याचे आश्वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांचे ते आश्वासनही पाळले नाही. वारंवार पैशांची मागणी करुनही या दोघांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.
मेडीकल शॉप भाड्याने चालविण्यासाठी देतो तसेच हॉटेल-स्पोटर्स दुकानातील गुंतवणुकीवर वीस टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून या दोघांनी गार्गी देसाई आणि ज्योती पवार यांच्याकडून ३४ लाख ५४ हजार रुपये घेतले, मात्र कुठलाही परतावा तसेच मूळ रक्कम न देता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर महेश सावंत आणि अमोल पांचाळ यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहै. या दोघांनी अशाच प्रकारे बतावणी करुन अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते.