मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – माहीम येथील एका विकासकाच्या कारमध्ये ठेवलेली सुमारे 25 लाखांची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या आरोपी कारचालकास खेरवाडी पोलिसांनी ठाणे रेल्वे स्थानकातून अटक केली. गुरुदेव सुभाष पाटील असे या आरोपी कारचालकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 23 लाख 72 हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. गुरुदेव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध धारावी आणि खेरवाडी पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नावेद मोहम्मद सिद्धीकी हे विकासक असून वांद्रे परिसरात राहतात. त्यांचा एसएलके हाऊसिंग अॅण्ड डेव्हलपमेंट नावाची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित असून त्याचे कार्यालय माहीम परिसरात आहे. गेल्या दहा महिन्यांपासून त्यांच्याकडे गुरुदेव हा कारचालक म्हणून कामाला आहे. 20 फेब्रुवारीला त्यांनी कामानिमित्त कार्यालयात 25 लाखांची कॅश आणली होती. ही कॅश कारच्या मागच्या सीटवर ठेवून ते गुरुदेवसोबत वाकोला आणि नंतर वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र गौरव अरोरा हा मित्र हादेखील होता. म्हाडा कार्यालयात जाताना त्यांनी गुरुदेवला कारमध्ये 25 लाखांची कॅश असल्याची कल्पना देताना त्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. दुपारी दिड वाजता म्हाडा कार्यालयातील काम संपवून ते त्यांच्या कारजवळ आले होते. यावेळी तिथे गुरुदेव आणि त्यांची कार नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.
काही वेळानंतर त्यांना त्यांच्या कार्यालयातील गिरीश चौधरीने फोन करुन गुरुदेव हा खेरवाडी पोलीस ठाण्याजवळ असून त्याने त्यांची कार अदानी इलेक्ट्रीसिटीसमोर पार्क केल्याचे सांगितले. त्यामुळे ते त्यांच्या मित्रासोबत तिथे गेले होते. तिथे त्यांची कार पार्क केली होती, मात्र आतमध्ये 25 लाखांची कॅश असलेली बॅग नव्हती. गुरुदेव हा 25 लाखांची कॅश घेऊन पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कर्मचार्याला त्याच्या सायन येथील घरी पाठविले होते. मात्र तो तिथे नव्हता. दुपारी घडलेल्या या चोरीच्या घटनेची नावेद सिद्धीकी यांनी रात्री खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर गुरुदेव याच्याविरुद्ध पोलिसांनी 25 लाखांची कॅश चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया यांनी यांनी गंभीर दखल आरोपी कारचालकाच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक कविराज जांभळे यांना दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार मोरे, पवार, ठोंबरे, पोलीस शिपाई सरवदे, पाटील, गायकवाड यांनी तपास सुरु केला होता. तपासादम्यान गुरुदेवविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित गुन्ह्यांची माहिती काढून त्याचा जुना मोबाईल क्रमांक प्राप्त केला होता. या मोबाईल क्रमांकावर त्याचे लोकेनशन काढत असतान तो सतत त्याच्या वास्तव्याची जागा बदलत होता. याच दरम्यान गुरुदेव हा लोकलने ठाणे रेल्वे स्थानकाच्या जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांना मिळाली होती. या माहितीनंतर संबंधित पथकाने ठाणे रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवून गुरुदेवला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यानेच 25 लाखांची कॅश चोरी करुन पलायन केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 23 लाख 72 हजार 500 रुपयांच्या पाचशे रुपयांच्या 4745 नोटा जप्त केल्या आहेत. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात गुरुदेव हा सायन येथील एलबीएस मार्ग, नाईकनगरात राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात कट रचून घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरी करणे, घातक शस्त्रे बाळगणे, सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी तीनहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांनी सांगितले.