मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मे 2025
मुंबई, – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील आरोपीस खेरवाडी पोलिसांनी अटक केली. रोहित सतोष धोबी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील बाईक, एक मोबाईल, चोरीची सोनसाखळी आणि कॅश असा एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांनी सांगितले.
त्रिवेणी वासु सालियन ही महिला वांद्रे येथील कलानगर परिसरात राहते. 30 एप्रिलला रात्री साडेआठ वाजता ती चेतना कॉलेजसमोरुन जात होते. यावेळी बाईकवरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिच्या गळयातील 50 हजाराची सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर तिने खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे, पोलीस निरीक्षक परशुराम कोरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार मोरे, सावंत, पवार, ठोंबरे, पोलीस शिपाई सरवदे, ठाकरे, पाटील, यादव यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन सोमवारी वांद्रे येथून पोलिसांनी रोहित धोबी याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. यापूर्वी त्याने विलेपार्ले परिसरात अशाच प्रकारे सोनसाखळी चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यांतील बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.