रिक्षाच्या धडकेने 65 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

अपघातप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक व जामिन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 डिसेंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका रिक्षाच्या धडकेने कुबराबानू शब्बीर मंसुरी नावाच्या 65 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी रिक्षाचालक कैलास सूर्यनारायण सिंग याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे पावणेपाच वाजता खार येथील सी. डी रोड, हनुमान मंदिराजवळील पिंपळेश्वर मंदिर चौकात झाला.

शब्बीर नूरमोहम्मद मंसुरी हे 69 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार त्यांची पत्नी कुबराबानू, मुलगा अल्ताफ, मुलगी कौसर आणि जावई कार्तिक यांच्यासोबत खार परिसरात राहतात. त्यांची पत्नी कुबराबानू ही नियमित पहाटे साडेचार वाजता मार्निंग वॉकसाठी जाऊन सकाळी आठ ते साडेआठ वाजता घरी परत येत होती. शनिवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकसाठी गेली होती, तिला डायबेटीजची तपासणीसाठी डॉक्टरकडे जायचे होते, त्यामुळे शब्बीरने तिला लवकरच घरी येण्यास सांगितले होते,

मात्र सकाळी आठ वाजूनही ती घरी आली नव्हती. याच दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाकडून त्यांना कुबराबानोचा अपघात झाला असून तिला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समजली होती. त्यामुळे ते सर्वजण भाभा हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले.

चौकशीदरम्यान कुजराबानू ही मार्निंग वॉकसाठी हनुमान मंदिराजवळील पिंपळेश्वर मंदिर चौक परिसरातून जात होती. यावेळी पावणेपाच वाजता एका रिक्षाने तिला जोरात धडक दिली होती. तयात ती गंभीररीत्या जखमी झाली होती, तिला आरोपी रिक्षाचालकानेच भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेनंतर शब्बीर मंसुरी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.

त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक कैलास सिंग याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page