बांधकाम क्षेत्रात गुंतवणुकीसह फ्लॅटच्या आमिषाने फसवणुक
साडेचार कोटीच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 मे 2025
मुंबई, – बांधकम क्षेत्रात गुंतवणुकीसह थ्री बीएचकेचे दोन फ्लॅटचे आमिष दाखवून एका वयोवृद्ध व्यावसायिकाची सुमारे साडेचार कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजश्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचा राजू भोजराज अडवाणी या बिल्डरविरुद्ध खार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तेरा वर्ष उलटूनही त्याने गुंतवणुकीवर परतावा दिला नाही किंवा फ्लॅटचा ताबा न देता तक्रारदार व्यावसायिकाची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत लवकरच राजू अडवाणीची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
69 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मुस्तफा अहमद बेहलीम हे व्यावसायिक असून सध्या ओमान, मस्कत येथे राहतात. ते आर्किटेक्ट असून त्यांचा ओमानमध्ये स्वतचा व्यवसाय आहे. वांद्रे येथे त्यांच्या मालकीचा एक फ्लॅट असून मुंबईत आल्यानंतर ते याच फ्लॅटमध्ये राहतात. राजू आडवाणी हा त्यांच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या परिचित असून त्यांच्यात कौटुंबिक संबंध आहे. त्यांच्यामार्फत त्यांची राजूशी ओळख झाली होती. 2010 साली ते ओमान येथून मुंबईत आले होते. सासरच्या मंडळीकडे जेवणाची पार्टी असल्याने ते त्यांच्या खार येथील घरी गेले होते. तिथे राजू हादेखील आला हेता.
कौटुंबिक गप्पा झाल्यानंतर राजूने त्यांना त्याची राजश्री कंन्स्ट्रक्शन नावाची एक बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनी असल्याचे सांगून मुंबई शहरात बांधकाम क्षेत्रास चांगले दिवस आहेत. त्यामुळे त्याने त्याच्या कंपनीत गुंतवणुक करावी, या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. यावेळी त्याने त्याच्या काही प्रोजेक्ट माहिती सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या प्रोजेक्टमध्ये चुन्नाभट्टी येथील एका इमारतीचा समावेश होता. या इमारतीचे बांधकाम सुरु असून त्यासाठी त्याला पैशांची गरज असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्यांनी गुंतवणुक करण्यास नकार दिला होता, मात्र राजूचे त्यांच्या सासरच्या मंडळीसोबत चांगले कौटुंबिक संबंध असल्याने त्याने त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
फेब्रुवारी ते ऑक्टोंबर 2010 या कालावधीत त्यांनी त्याला त्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी 2 कोटी 45 लाख रुपये दिले होते. याच दरम्यान त्याने त्यांना त्याचे वांद्रे येथे एका पुर्नविकास इमारतीचे बांधकाम सुरु होणार असून तिथे त्यांना गुंतवणुकीस करण्यास सांगितले होते. या गुंतवणुकीवर त्यांना फ्लॅटसह संपूर्ण माळा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून जुलै 2011 रोजी त्यांनी त्याला दोन कोटी रुपये दिले होते. काही दिवसांनी ते पुन्हा ओमान येथे निघून गेले होते. तिथे असताना ते त्याच्या संपर्कात होते. चुन्नाभट्टीसह वांद्रे येथील प्रोजेक्टची माहिती घेत होते.
मुंबईत आल्यानंतर त्यांना दोन्ही इमारतीचे काम सुरु झाले नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा करुन त्यांच्या साडेचार कोटीची मागणी केली होती. यावेळी त्याने त्यांना आठ धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले. यावेळी त्याने त्यांना थोडे थोडे करुन पैसे देण्याचे आश्वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत पैसे परत केले नाही. पैसे देणे शक्य नसल्याने त्याने त्यांना त्याच्या सायन येथील एका इमातरीमध्ये थ्री बीएचके दोन फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही.
तेरा वर्ष उलटूनही राजूकडून गुंतवणुक रक्कम मिळाली नाही किंवा फ्लॅट ताबा मिळाला नव्हता. त्याचयाकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खार पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राजू अडवाणी याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे. त्याने गुंतवणुकीच्या नावाने इतर काही लोकांकडून पैसे घेतले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.