व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने 55 लाखांची फसवणुक
महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – व्यवसायात 55 लाखांची गुंतवणुक केल्यास तीन महिन्यांत 95 लाख रुपये देण्याच्या आमिषाने एका महिलेची तिच्याच परिचित एका जोडप्याने सुमारे 55 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध खार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रविण नार्वेकर आणि प्रमिला प्रविण नार्वेकर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही खारचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मनिषा राजेंद्र निकम ही तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत बोरिवली येथे राहते. गेल्या 45 वर्षांपासून नार्वेकर पती-पत्नी तिच्या परिचित असून ते दोघेही सध्या खार येथील दहावा रस्ता, उर्मी इमारतीमध्ये राहतात. त्यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याने त्याचे एकमेकांच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. प्रविणची प्रांजल मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी असून ही कंपनी सोन्याच्या व्यवहारात असल्याचे त्याने त्यांना सांगितले होते. सप्टेंबर 2025 रोजी प्रविण आणि प्रमिला यांनी त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती.
त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. कंपनीत 55 लाखांची गुंतवणुक केल्यास त्यांना तीन महिन्यांत 95 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ते दोघेही तिच्या परिचित तसेच त्यांच्या कौटुंबिक संबंध असल्याने तिने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांना एक लोन करार झाला होता. या करारानंतर तिने त्यांना टप्याटप्याने 55 लाख रुपये दिले होते. कराराप्रमाणे त्यांना 95 लाख रुपये मिळणार होते. त्यांनी त्यांना सिक्युरिटी धनादेश देताना हा धनादेश त्यांना तीन महिन्यानंतर बँकेत टाकण्यास सांगितले होते.
तीन महिन्यानंतर मनिषाने त्यांना संपर्क साधून पैशांविषयी विचारणा केली होती. मात्र ते दोघेही तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांनी त्यांनी तिच्यासह तिच्या पतीचा मोबाईल ब्लॉक केला होता. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले होते. यावेळी तिने प्रमिलाकडे पैशांची मागणी केली, पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धम्की दिली होती. या धमकीनंतर प्रमिलाने तिला पोलिसांत तक्रार करु नकोस, तिचा पती बाहेरगावी गेला आहे, मुंबईत परत येताच तिला तिची रक्कम व्याजासहीत देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे तिने त्यांनी दिलेला धनादेश बँकेत टाकला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. व्यवसायासाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन तीन महिन्यांत चांगला परतावा देतो असे सांगून प्रविण आणि त्याची पत्नी प्रमिला नार्वेकर यांनी मनिषा निकम हिची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पती-पत्नीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रविण आणि प्रमिला नार्वेकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.