इंटाग्रामवरील फोटोनंतर दिड वर्षांनी दागिन्यांची चोरी उघड

सफाई कर्मचारी म्हणून काम करणार्‍या मोलकरणीविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – चोरीची हिरेजडीत अंगठी घातलेला फोटो इंटाग्रामवर अपलोड करणे एका सफाई कर्मचारी मोलकरणीला चांगलेच महागात पडले. या फोटोमुळे गेल्या वर्षी चोरीस गेलेल्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी खार पोलिसांनी संबंधित मोलकरणीवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. संजना संतोष गुजर असे या महिलेचे नाव असून तिच्या चौकशीनंतरच चोरीबाबत अधिकृत काहीही सांगता येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

४९ वर्षांची नंदीता निमित ठक्कर ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत खार परिसरात राहते. तिच्याकडे घरकामासाठी शंकुतला आणि सलोनी नावाच्या दोन महिला असून त्या दोघीही अनुक्रमे सात आणि दोन वर्षांपासून काम करतात. डिसेंबर २०२२ साली ती एका कार्यक्रमासाठी तिचे हिरेजडीत दागिने घालून गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर तिने तिचे सर्व दागिने कपाटात ठेवले होते. याच दरम्यान सलोनी तिच्या गावी गेली होती. त्यामुळे काही दिवसांसाठी तिने तिच्या घरी संजना गुजर हिला कामासाठी ठेवले होते. १२ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ या कालावधीत ती तिच्याकडे कामाला होती. सलोनी गावाहून परत आल्यानंतर तिने संजनाला कामावर काढून टाकले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत तिला एका कार्यक्रमासाठी जायचे होते, त्यामुळे तिने कपाटातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला कपाटातून हिरेजडीत कानातील रिंग, पाच हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या असा आठ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. याबाबत तिने शंकुतला आणि सलोनीकडे विचारणा केली होती. मात्र या दागिन्याविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. या दोघींवर तिचा विश्‍वास असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

१० सप्टेंबर २०२४ ती इंटाग्राम पाहत असताना तिला संजना गुजरचा एक फोटो दिसला होता. या फोटोमध्ये तिच्या हातातील हिरेजडीत अंगठी तिची होती. ही अंगठी पाहिल्यानंतर संजनानेच तिच्या घरी चोरी केल्याचा तिला संशय आला होता. त्यामुळे तिने खार पोलीस ठाण्यात संजना गुजरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. चोरीची घटना जुनी असल्याने या तक्रारीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चोरीच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यास तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page