मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – खार परिसरातील एका व्यावसायिक महिलेच्या घरात झालेल्या सुमारे ३४ लाख रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच महिमा नागेंद्र निशाद नावाच्या २० वर्षांच्या मोलकरीण तरुणीला खार पोलिसांनी अटक केली. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या दागिन्यांचे फोटो स्वतच्या मोबाईलवरील डिपीवर ठेवणे तिला महागात पडले. तिचा डिपी पाहिल्यानंतर तक्रारदार व्यावसायिक महिलेला तिच्यावर संशय आला आणि तिने पोलिसांत तक्रार केली होती. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून तिच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.
पांचाली संतोष ठाकूर ही ५७ वर्षांची व्यावसायिक महिला तिच्या भावासोबत खार परिसरात राहते तिच्या घरापासून काही अंतरावर तिचे वयोवृद्ध आई-वडिल राहत असून त्यांच्याकडे पाच नोकर आहेत. तिच्या आईचा मणका फॅक्चर झाला होता, त्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी तिने महिमा निशाद हिला केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. महिमा ही मूळची उत्तरप्रदेश, गोरखपूरची रहिवाशी असून सध्या ती सांताक्रुज येथील वाकोला, आनंदनगर परिसरात राहत होती. एप्रिल २०२३ पासून ती त्यांच्याकडे कामावर होती. तिच्या आईच्या रुममध्ये एक लॉकर असून जे पासवर्डने उघडले जाते. गरजेच्या वेळेस पासवर्ड आठवत नसल्याने तिला एक चावी देण्यात आली होती. या चावीसह पासवर्डबाबत महिमाला माहिती होती. या लॉकरमध्ये तिने तिचे सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश ठेवले होते.
१ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनच्या दिवशी ती तिच्या आईकडे दागिने घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला लॉकर उघडता आले नाही. तिला लॉकरची चावीही सापडली नाही. अखेर तिने दुसर्या चावीने लॉकर उघडले असता तिला ज्वेलरीचा बॉक्स खाली असल्याचे दिसून आले. आतील ३४ लाख २३ हजार रुपयांचे विविध सोन्याचे, चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपयांची कॅश असा मुद्देमाल चोरीस गेला होता. हा प्रकार तिने तिच्या आई-वडिलांना सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यात कामाचा प्रचंड प्रेशर असल्याने तिने पोलिसांत तक्रार केली नव्हती. चौकशीदरम्यान त्यांच्या घरी महिमा ही राहत होती. सप्टेंबर महिन्यांत कामावरुन तिच्यावर तिची आई रागावली होती. त्यानंतर ती अचानक काम सोडून गेली होती.
८ नोव्हेंबरला तिला महिमाचा व्हॉटअप डिपीवर एका फोटो दिसला होता. त्यात महिमाच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि उजव्या हातातील अंगठी ही तिच्या आईची असल्याचे दिसून आले. तिच्या घरी महिमानेच चोरी केल्याची खात्री पटताच ८ नोव्हेंबरला तिने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शनिवारी महिमाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.