मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कोकेन विक्रीसाठी आलेल्या एका त्रिकुटाला खार पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेसह दोन नायजेरीयन नागरिकांचा समावेश आहे. संतोषकुमार फुलघंड यादव, अनानी कंफर्ट आणि कॉसमॉस न्योण्ये अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी कोकेनसह २३ हजाराची कॅश जप्त केली आहे. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.
खार परिसरात काही विदेशी नागरिक कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवीदास पडलवार, हणमंत कुंभारे, पोलीस हवालदार भरत काचे, दिनेश शिर्के, पोलीस शिपाई योगेश तोरणे, महेश लहामगे, मनोज हांडगे, मयुकर जाधव यांनी खार येथील नववा रोड, विष्णुदास बुवा कदम गार्डनजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या संतोषकुमार यादव या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोसिंानी कोकेन जप्त केले होते. त्याच्या चौकशीतून दोन नायजेरीयन नागरिकांचे नाव समोर आले होते. त्यांनीच त्याला ते कोकेन विक्रीसाठी दिले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकाने अनानी कंफर्ट आणि कॉसमॉस न्योण्ये या दोघांनाही अटक केली. ते दोघेही नालासोपारा आणि वसई परिसरात राहत असून या दोघांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. अनानी या महिलेच्या घरातून कोकेन आणि गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला होता. या तिघांविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवार ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.