व्यावसायिकाला दिड कोटीच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी
सुरतच्या दोन व्यावसायिकाविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – व्यावसायिक वादातून खार परिसरातील एका व्यावसायिकाला दिड कोटीच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सुरतच्या दोन व्यावसायिकाविरुद्ध खार पोलिसांनी खंडणीसह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दक्ष त्रिवेदी आणि प्रकाश कनानी अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४२ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक खार परिसरात राहतात. दक्ष त्रिवेदी आणि प्रकाश कनानी हे दोघेही त्यांच्या परिचित व्यावसायिक असून ते दोघेही गुजरातच्या सुरतचे रहिवाशी आहेत. २०२२ ते २०२४ या कालावधीत त्यांचे दक्ष त्रिवेदी, उमंग शहा, आणि मिलाप शहा यांच्यासोबत त्यांच्या मालकीच्या कॉफी बाय डी बेला या कॉफी शॉपचाएक करार झाला होता. मात्र या तिघांनी त्यांच्यासोबत व्यवसाय करताना भागीदारीच्या अटी आणि शर्तीचा भंग केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत करार रद्द केला होता. तसेच त्यांनी त्यांचे आर्थिक नुकसान केल्याबाबत माहीम पोलीस ठाण्यात तिन्ही व्यावसायिाकविरुद्ध तक्रार केली होती.
ही माहिती नंतर दक्ष त्रिवेदीला समजली होती. त्याच्या रागातून दक्षने त्याचा मित्र प्रकाश कनानीसोबत त्यांच्यासोबत २८ जानेवारी आणि २९ जानेवारीला कॉल करुन वाद घालून शिवीगाळ केली होती. त्यांनी माहीम पोलीस ठाण्यात केलेली तक्रार मागे घेण्याची धमकी दिली होती. त्यांनी तक्रार मागे न घेतल्यास त्यांना त्यांच्या कुटुंबियांना महागात पडेल. इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नीसह मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याचे सांगून त्यांच्याकडेच दिड कोटीच्या खंडणीची मागणी केली होती.
या प्रकाराने ते प्रचंड भयभीत झाले होते. दक्ष आणि प्रकाशकडून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या जिवाला धोका असल्याने त्यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दक्ष त्रिवेदी आणि प्रकाश कनानी या दोघाविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.