जीएसटीच्या 46 लाखांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन फसवणुक
तक्रारदार व आरोपी अभिनेते फरहान अख्तर यांचे आजी-माजी कर्मचारी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 डिसेंबर 2025
मुंबई, – जीएसटी भरण्यासाठी दिलेल्या सुमारे 46 लाखांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन फसवणुक केल्याप्रकरणी भगवान अनंत कासकर या आरोपीविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेळीच जीएसटीची रक्कम न भरल्याने तक्रारदारांना सुमारे 65 लाखांची मूळ रक्कमेसह व्याज आणि दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. यातील तक्रारदार आणि आरोपी निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेते फरहान अख्तर यांच्या एक्सेल इंटरनेटमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे आजी-माजी कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. भगवानने कंपनीसह इतर कर्मचार्यांच्या जीएसटीच्या रक्कमेचा अपहार केला का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
विशाल रमेश रामचंदानी हे सांताक्रुज येथे राहतात. ते सध्या चित्रपटसृष्टीशी संबंधित एक्सेल इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. या कंपनीने आतापर्यंत अनेक चित्रपटाची निर्मिती केली असून त्यात दिल चाहता है, डॉन, रॉक ऑन, डॉन 2, जिंदगी नही मिलेगी दुबारा, दिल धडकने दो, रईस आदी चित्रपटांचा समावेश आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय खार परिसरात असून कंपनीचे संचालक निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर व रितेश सिधवानी संचालक आहेत.
गेल्या सतरा वर्षांपासून विशाल रामचंदानी याच कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीत पूर्वी भगवान हा अकाऊंट विभागात कामाला होता. त्यांच्याकडे कंपनीसह कर्मचार्यांच्या जीएसटी भरण्याचे काम होते. त्यामुळे तेदेखील त्याच्याकडे जीएसटीसंबंधित काम देत होते. अनेकदा जीएसटीची रक्कम भरण्यासाठी ते त्याच्या बँक खात्यात संबंधित रक्कम ट्रान्स्फर करत होते. चार वर्षांपूर्वी भगवानने ही नोकरी सोडून दिली होती. गेल्या वर्षी कंपनीचे सीएफओ जसवंत सिंग यांनी कंपनीची जीएसटीची रक्कम जमा होत नसल्याबाबत विचारणा केली होती.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांनी भगवानकडून त्यांच्या जीएसटी पोर्टलच्या आयडी आणि पासवर्डची माहिती घेतली होती. त्यात त्यांना 2019 ते 2024 या कालावधीचा रिपोर्ट प्राप्त झाला होता. त्यात त्यांनी भगवानला जीएसटीची रक्कम भरण्यासाठी 56 लाख रुपये दिले होते. मात्र त्याने फक्त पावणेदहा लाख रुपये जीएसटी रक्कम भरल्याचे दिसून आले. या रक्कमेवरुन भगवानने त्यांनी दिलेल्या 46 लाख 24 हजार रुपयांचा परस्पर अपहार केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांना व्याजासह दंड आकारण्यात आला होता. त्याची रक्कम 65 लाख 85 हजार 472 रुपये झाली होती. ही रक्कम त्यांना जीएसटी कार्यालयात भरणे बंधनकारक होते.
या प्रकारानंतर त्यांनी भगवानकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने संबंधित रक्कमेचा त्याने वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याची कबुली दिली होती. ही रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने त्यांना काही धनादेश दिले होते. मात्र त्यांना ते धनादेश बँकेत टाकण्यास मनाई केली होती. वारंवार विचारणा करुनही त्याने ही रक्कम परत केली नाही किंवा त्यांना धनादेश बँकेत टाकण्याची परवानगी दिली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांना जीएसटीसाठी मूळ रक्कमेसह व्याज आणि दंडाची 65 लाख 82 हजार रुपयांची भरावी लागणार होती.
भगवानकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर भगवान कासकरविरुद्ध पोलिसांनी जीएसटीच्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. त्याने कंपनीसह कर्मचार्यांच्या जीएसटीच्या रक्कमेचा अपहार केला आहे का याचाही पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.