लाकडी परांचीवर चढून घरफोडी करणार्या आरोपीस अटक
पेट्रोलियम कंपनीच्या अधिकार्याच्या घरी ५० लाखांची चोरी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – भारताचे ब्रिटीश पेट्रोलियम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अनिवासी भारतीय शशि अलंकारथ मुकूंदन यांच्या घरासह कार्यालयात झालेल्या सुमारे ५० लाखांच्या घरफोडीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दिपक रविंद्र खबळे या ३१ वर्षांच्या आरोपीस खार पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिपक हा दिवसा शहरात सुरु असलेल्या डागडुजी असलेल्या इमारतीला टार्गेट करुन रात्रीच्या वेळेस लाकडी परांचीवर चढून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन चोरी करतो. अशा गुन्ह्यांतील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शशि मुकूंदन हे ६७ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत खार परिसरात राहतात. त्यांच्याकडे पाच नोकर असून त्यापैकी महिला काम करुन त्यांच्या घरी जातात तर तीन नोकर इमारतीच्या दहाव्या मजल्यावर नोकरीसाठी असलेल्या रुममध्ये राहतात. ते भारतीय नागरिक असून त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे. सध्या ते ब्रिटीश पेट्रोलियम कंपनीत भारत देशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. ३१ डिसेंबरला ते सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना घरासह कार्यालयातील सीसीटिव्हीचे मॉनिटर बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी डिव्हीआर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांना सापडला नाही. दहाव्या मजल्यावरील कार्यालयाची पाहणीदरम्यान त्यांना तिथे चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कार्यालयातील सामानाची पाहणी केली असता त्यांना विविध कंपनीचे २४ हून महागडी घड्याळ, तीन ऍपल कंपनीचे मोबाईल, दोन डिजीटल कॅमेरा, लॅपटॉप, ग्रे रंगाची बॅगपॅक, डिव्हीआर असा सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने पळविल्याचे दिसून आले.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी खार पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शशि मुकूंदन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद केला होता. या घरफोडीच्या घटनेची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांनी गंभीर दखल घेत खार पोलिसांना तपासाचे अदेश दिले होते. या आदेशांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार काळे, पोलीस उपनिरीक्षक कुंभारे, पोलीस अंमलदार मनोज वैद्य, भरत काच्चे, दिनेश शिर्के, योगेश तोरणे, महेश लहामगे, मयुर जाधव, मारुती गळवे, मनोज हांडगे यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांत दिपक खबळे याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पथकाने दिपकचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला दहिसर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. तो दहिसर येथील भाऊसाहेब परब रोड, दहिसर ब्रिज, कांदरपाड्याचा रहिवाशी आहे. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा सुमारे ५० लाखांचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दिपक हा अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खारसह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. दिपक हा डागडुजी चालू असलेल्या इमारतीची रेकी करुन तिथे बांधण्यात आलेल्या लाकडी परांचीवर चढून रात्रीच्या वेळेस चोरी करत होता. अशा गुन्ह्यांतील तो सराईत गुन्हेगार आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.