मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तींच्या घरी घरफोडी
फ्लोरिंगसह कारपेंटरचे साहित्य अज्ञात चोरट्याने पळविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 जुलै 2025
मुंबई, – मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय महादेव ठिपसे यांच्या खार येथील राहत्या घरी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. फ्लॅटच्या नूतनीकरणाच्या फ्लोरिंगसह कारपेंटर कामासाठी आणलेले साहित्य अज्ञात चोरट्याने पळवून नेले आहे. शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
जळगावचे रहिवाशी असलेले अनिल देवीदास ठाकरे हे खार येथे राहत असून चालक म्हणून कामाला आहे. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्याकडे चालक म्हणून काम करतात. त्यांच्याच खार येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अभय ठिपसे यांच्या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत लोकनिर्माण सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या घराचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून सध्या फ्लोरिंगसह कारपेंटरचे काम सुरु होते. त्यासाठी शैलेश मल्ला हा फ्लोरिंग तर फैय्याज इद्रीस हा कारपेंटरचे काम करत होता.
सकाळी दहा ते सायंकाळ साडेसहा वाजतेपर्यंत ते काम चालत होते. काम संपल्यानंतर ते त्यांचे सामान तिथे ठेवून घरी जात होते. गुरुवारी 24 जुलैला सायंकाळी साडेसहा वाजता ते दोघेही त्यांचे काम संपवून घरी निघून गेले होते. फ्लॅटला कुलूप लावून त्यांनी चावी अनिल ठाकरे यांना दिली. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ते फ्लॅटवर आले होते. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना फ्लोरिंग आणि कारपेंटरचे सर्व साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने बाथरुम-टायलेटमधील काचा काढून फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी कारपेंटर आणि फ्लोरिंगच्या कामासाठी आणलेले विविध 25 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच अनिल ठाकरे यांनी खार पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अनिल ठाकरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. एका माजी न्यायमूर्तींच्या फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत खार पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशांनतर खार पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.