मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ जुलै २०२४
मुंबई, – भरस्त्यात एका तेरा वर्षांच्या मुलीचा तिच्याच नातेवाईकाने अश्लील स्पर्श करुन विनयभंग केल्याची घटना खार परिसरात घडली. या मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन निर्मलनगर पोलिसांनी आरोपी नातेवाईकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
३६ वर्षांची तक्रारदार महिला ही खार परिसरात राहते. तेरा वर्षांची बळीत तिची मुलगी आहे तर आरोपी तिचा नातेवाईक आहे. रविवारी ही मुलगी कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आली होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने या मुलीचा हात पकडून तिच्या कमरेला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी पळून आली. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्या दोघीही निर्मलनगर पोलीस ठाण्यात गेले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या महिलेने आरोपी नातेवाईकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ७४ भारतीय न्याय संहिता सहकलम ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस खार येथून पोलिसांनी अटक केली.