मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – बदलापूर येथे एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलीवरील लैगिंक अत्याचारानंतर झालेल्या राड्याची घटना ताजी असतानाच खार परिसरात शाळेत जाणार्या बारा आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन त्यांना घाबरविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरुन खार पोलिसांनी पाठलाग करणार्या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा ंनोंदविण्यात आला आहे.
बदलापूरच्या घटनेने मुंबई शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क होते. त्यातच खार परिसरात सहा आणि बारा वर्षांच्या शाळकरी मुलींचा एका तरुणाने पाठलाग केला होता. पाठलाग करुन त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ते प्रचंड भयभीत झाल्या होत्या. घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी खार पोलिसांत आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या तरुणाला अटक केली. तपासात या दोन्ही बहिणी खार परिसरात राहत असून याच परिसरात आरोपी राहतो. ते एकमेकांच्या परिचित आहे. आरोपीला ड्रग्जचे व्यसन होते. त्यामुळे त्याला समुपदेशन केंद्रात पाठविण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच तो समुपदेशन केंद्रातून त्याच्या खार येथील राहत्या घरी आला होता. यावेळी त्याने शाळेत जाणार्या या दोन्ही अल्पवयीन बहिणींचा पाठलाग करुन त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा पाठलाग करणे त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.