दारुच्या ग्लासमध्ये पाणी ओतले नाही म्हणून मुलीचा विनयभंग
मारहाणीसह विनयभंग व पोक्सोच्या गुन्ह्यांत पित्याला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – दारुच्या ग्लासमध्ये पाणी ओतले नाही म्हणून एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच पित्याने अश्लील शिवीगाळ व मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मारहाणीसह विनयभंग आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून निर्मलनगर पोलिसांनी ४७ वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जा आहे.
४० वर्षांची तक्रारदार महिला तिच्या आरोपी पती आणि चौदा वर्षांच्या मुलीसोबत खार परिसरात राहते. बळीत मुलगी याच परिसरातील एका खाजगी शाळेत नववीत शिकते. ७ जानेवारीला तिचे चालक वडिल घरात मद्यप्राशन करत होते. यावेळी त्याने त्याच्या मुलीला दारुच्या ग्लासमध्ये पाणी ओतण्यास सांगितले, त्यास तिने नकार दिला होता. त्याचा राग आल्याने त्याने मुलीला अश्लील शिवीगाळ केली. स्वतची पॅण्ट काढून तिच्यासमोरच अश्लील कृत्य केले. तिला शिवीगाळ करुन स्टिलच्या भांड्याने आणि हाताने बेदम मारहाण केली होती. जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला होता. याच कारणावरुन तो तिच्याशी दोन दिवस वाद घालत होता. त्याला कंटाळून शुक्रवारी बळीत मुलीच्या आईने निर्मलनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्याच पतीविरुद्ध शिवीगाळ करुन मारहाण करणे, विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शनिवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली.