मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच पालकांनी भिक्षा मागण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
गुरुवारी खार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पडलवार, पोलीस शिपाई मोकाशी, महिला पोलस शिपाई सुनिता पवार हे खार परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी पावणेपाच वाजता खासर येथील सोळावा रस्ता, बोक्का कॅफेसमोर एक अल्पवयीन मुलगी येणार्या-जाणार्या लोकांकडे भिक्षा मागत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या पथकाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पळू लागली. यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिचे वय सात वर्ष असून ती तिच्या आई-वडिलांसोबत खार येथील नॅशनल कॉलेजसमोरील फुटपाथवर राहत असल्याचे सांगितले. तिच्या आई-वडिलांनी तिला भिक्षा मागण्यास प्रवृत्त केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध पोलिसांनी ५, ९, ११ भीक मागण्यास प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम आणि २४ अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.